मंत्री बाबुश मोन्सेरात यांची माहिती : मामलेदार कार्यालयाचे स्थलांतर होणार
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा तालुक्यात सर्व प्रशासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ‘महसूल भवन’ उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी सोयिस्कर भूखंडाचा शोध सुरु आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाबुश मान्सेंरात यांनी दिली. तिस्क-फोंडा येथील सरकारी इमारतीच्या तिसऱया मजल्यावरील मामलेदार कार्यालय लवकरच पहिल्या मजल्यावर स्थलांतरीत केले जाईल. तसेच कदंब बसस्थानकावर असलेले नागरा rसेवा केंद्र पुन्हा सरकारी इमारतीमधील जून्या माहितीघराच्या ठिकाणी हलविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री मोन्सेरात यांनी सोमवारी फोंडा येथील प्रशासकीय कार्यालयांना भेटी देऊन तेथील विविध समस्यांचा आढवा घेतला. यावेळी फोंडय़ाचे पालकमंत्री रवी नाईक, नगराध्यक्ष रितेश नाईक, नगरसेवक विश्वनाथ दळवी, आनंद नाईक तसेच महसूल खात्याचे सचिव संदीप जेकीस, रमेश वर्मा, संदीप जेकीस, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी ज्योती कुमारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी विशाल कुंडईकर, केदार नाईक, जॉन्सन फर्नांडिस व अन्य सरकारी अधिकारी उपस्थित होते.
माहिती घर पुन्हा जुन्या जागेत हलविणार
तिस्क-फोंडा येथील सरकारी संकुलात असलेले मामलेदार, अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, भू सर्वेक्षण यासह अन्य सरकारी कार्यालयांना मंत्री मोन्सेरात यांनी भेटी दिल्या व अधिकाऱयांशी चर्चा केली. काही कार्यालयांना जागा अपुरी पडत असल्याने विविध कामांसाठी येणाऱया नागरिकांची गैरसोय होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. मामलेदार कार्यालय तिसऱया मजल्यावर असल्याने ज्येष्ठ नागरिक व इतरांना ते त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे मामलेदार कार्यालय पहिल्या मजल्यावर स्थलांतरीत करण्याचा निर्णय झाल्याचे मंत्री मोन्सेरात यांनी सांगितले. तळमजल्यावर असलेले माहिती घर विविध सरकारी योजना व अन्य कामांची माहिती मिळविण्यासाठी जनतेला सोयिस्कर होते. कदंब बसस्थानकावर ते स्थलांतरीत केल्यापासून लोकांचे हेलपाटे वाढले आहेत. त्यामुळे ते जुन्यात जागेत आणावे, असा मंत्री रवी नाईक यांचा प्रस्ताव होता. त्यानुसार आता नागरी सेवा केंद्र पुन्हा सरकारी इमारतीच्या तळमल्यावर आणले जाणार आहे.
केरये कचरा प्रकल्पाची क्षमता 10 टन होणार
फोंडा नगरपालिकेच्या केरये-खांडेपार येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पालाही मंत्री मोन्सेरात यांनी भेट देऊन पाहणी केली. फोंडा शहराची गरज ओळखून या प्रकल्पाचा विस्तार केला जाणार आहे. सध्याचा प्रकल्प दीड टन क्षमेचा असून त्याची क्षमता 10 टनांपर्यंत केली जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. दुपारच्यावेळी राजीव गांधी कलामंदिरमध्ये सर्व सरकारी कार्यालय प्रमुखांसोबत मंत्री मोन्सेरात यांची बैठक झाली. त्यानंतर तालुक्यीतल सरपंच, पंचसदस्य व जिल्हा पंचायत सदस्यांशी चर्चा करण्यात आली.
प्रलांबित कुळ-मुंडकार खटल्याविषयी बोलताना, हे खटले जलदगतीने मार्गी लागण्यासाठी जादा संयुक्त मामलेदारांची भरती केली जाणार आहे. सध्या राज्यात या पदांची कमतरता आहे. त्यासाठी गोवा नागरी सेवा आयोगाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे मंत्री मोन्सेरात यांनी सांगितले.