15 पैकी 7 जणांच्या स्वाक्षऱया : रितेश नाईक यांचे नाव पुन्हा चर्चेत
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर यांच्याविरुद्ध अविश्वास नोटीस जारी करण्यात आली आहे. 15 पैकी 7 नगरसेवकांच्या त्यावर स्वाक्षऱया असून पालिका संचालकांना काल सोमवारी या नोटीसीची प्रत सादर करण्यात आली. अवघ्या चार महिन्यांत कोलवेकर यांच्याविरुद्ध अविश्वास दाखल केल्याने फोंडा पालिकेवरील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे.
भाजपा समर्थक असलेले उपनगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर यांच्यासह नगरसेवक विश्वनाथ दळवी, यतीश सावकार, रितेश नाईक, आनंद नाईक, विलियम आगियार व अर्चना डांगी या सातजणांच्या त्यावर स्वाक्षऱया आहेत. अविश्वास ठराव संमत होण्यासाठी आठ नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक असून ठरावावरील मतदानाच्यावेळी हे बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
नगराध्यक्षपदासाठी भाजपातर्फे आमदार रवी नाईक यांचे पुत्र नगरसेवक रितेश नाईक यांचे नाव पुन्हा चर्चेत आहे. मागच्यावेळी भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. मात्र फोंडा भाजपाचे गटाध्यक्ष असलेल्या शांताराम कोलवेकर यांनी पक्षांतर्गत बंड करीत त्यांच्याविरोधात अर्ज भरला. मगो आणि गोवा फॉरवर्डचे समर्थक असलेल्या नगरसेवकांच्या पाठिंब्याने ते नगराध्यक्षही बनले. त्यावेळच्या या राजकीय घडामोडींमुळे भाजपाला फोंडा पालिकेवरील आपली सत्ता गमवावी लागली होती. रितेश नाईक यांना नगराध्यक्ष बनविणे हे फोंडय़ाचे आमदार रवी नाईक व भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेचे बनून राहिले आहे. शांताराम कोलवेकर यांनी पक्षाविरोधात जाऊन नगराध्यक्षपद पदरी पाडल्यानंतर भाजपाने तात्काळ फोंडा गटाध्यक्ष पदावरुन त्यांना हटविले होते. कोलवेकर यांच्यावर अविश्वास ठराव आणल्याने बहुमतासाठी नगरसेवकांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. शांताराम कोलवेकर यांची 18 मे रोजी नगराध्यक्षपदी निवड झाली होती. अवघ्या चार महिन्यांत त्यांच्यावर अविश्वास आणल्याने पुन्हा एकदा फोंडा पालिकेवरील सत्ताबदलासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.