प्रतिनिधी /फोंडा
फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. सोमवार 27 रोजी त्यांनी आपले राजीनामापत्र पालिका संचालनालयाकडे पाठविले आहे. आपण स्वच्छेने राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले.
कोलवेकर हे गेल्या 28 मे रोजी नगराध्यक्ष बनले होते. त्यावेळी भाजपाने रितेश रवी नाईक यांना पक्षातर्फे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले होते. मात्र कोलवेकर यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मगो व गोवा फॉरवर्डच्या पाठिंब्यावर हे पद पदरी पाडले होते. पक्षाविरोधात बंड केल्याने फोंडा भाजपा मंडळाच्या अध्यक्षपदावरुन त्यांना हटविण्यात आले होते. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात कोलवेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. 5 ऑक्टोबर रोजी त्यावर चर्चा होऊन बहुमताअभावी तो बारगळला गेल्याने त्यांचे पद कायम राहिले.
मगो व गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा देताना झालेल्या अलिखित करारानुसार कोलवेकर यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे समजते. त्यांच्या राजीनाम्यामुळे फोंडा पालिकेवर राजकीय घडामोंडींना पुन्हा वेग आला आहे.