खासदार विनय तेंडुलकर यांचा दावा, नगरसेवक यतीश सावकार यांचा भाजपा प्रवेश
प्रतिनिधी/ फोंडा
फोंडा पालिकेवर भाजपा नगरसेवकांची संख्या येत्या काही दिवसांत दहावर पोचणार असून नगरसेवक यतीश सावकार यांच्या प्रवेशाने त्याची सुरुवात झाली आहे. सध्या पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या नगरसेवकांचे संख्याबळ 7 असून लवकरच ते दहावर पोचणार असल्याच्या दावा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी दिली.
मगो पक्षातून भाजपात प्रवेश केलेले नगरसेवक यतीश सावकर यांना तेंडुलकर यांनी पक्षात रितसर प्रवेश दिल्यानंतर ते प्रसार माध्यमांसमोर बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, फोंडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक शांताराम कोलवेकर, नगरसेवक रितेश नाईक, आनंद नाईक, विलीयम आगियार, अर्चना डांगी, पक्षाचे पदाधिकारी सुनिल देसाई हे उपस्तित होते. फोंडा पालिकेला कचरा प्रकल्पासाठी खासदार निधीतून रु. 4 कोटींचा निधी मंजूर केल्याची घोषणा खासदार तेंडुलकर यांनी यावेळी केली. नुकत्याच झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात जाऊन मगोच्या उमेदवाराला मतदान केलेल्या त्या दोघा नगरसेवकांवर पक्षातंर्गत कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाच्या सर्वांना सामावून घेत पुढे जाण्याच्या कार्यपद्धतीमुळे आपण या पक्षात प्रवेश केल्याचे यतीश सावकार यांनी सांगितले.
दरम्यान मगो पक्षातील नगरसेवक विरेंद्र ढवळीकर हे भाजपाच्या संपर्कात असून, येत्या काही दिवसांत ते भाजपावासी होण्याची शक्यता आहे.