15 पैकी 8 जणांच्या स्वाक्षऱया : नगराध्यक्ष रितेश की विश्वनाथ?
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष गीताली तळावलीकर व उपनगराध्यक्ष जया सावंत यांच्याविरुद्ध अविश्वास नोटीस जारी करण्यात आली आहे. 15 पैकी 8 नगरसेवकांच्या त्यावर स्वाक्षऱया असून पालिका संचालकांना शनिवारी या नोटीसीची प्रत सादर करण्यात आली. फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यांची डॉ. सावंत मंत्रीमंडळात मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर गीताली तळावलीकर व जया सावंत यांच्याविरुद्ध अविश्वास दाखल केल्याने फोंडा पालिकेवरील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे.
विधानसभा निवडणूकीत कॉग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिलेले व विधानसभा निवडणूकपुर्वी रवी नाईक यांचे खंदे कार्यकर्ते असलेले विलयम्स आगियार त्याचीही या अविश्वास ठरावावर स्वाक्षऱया असून फोंडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगरराध्यक्ष विश्वनाथ दळवी, विरेंद्र ढवळीकर, यतीश सावकार, रितेश नाईक, आनंद नाईक, चंद्रकला नाईक व अर्चना डांगी या आठजणांच्या त्यावर स्वाक्षऱया आहेत.
गीताली तळावलीकर यांची 11 जानेवारी 2022 रोजी नगराध्यक्षपदी निवड झाली होती. अवघ्या 82 दिवसात त्यांच्यावर अविश्वास आणण्यात आला. जया सावंत यांची ऑक्टो 2021 रोजी उपनगराध्यक्षपदी निवड झाली होती. पुन्हा एकदा फोंडा पालिकेवरील संगीत खुर्चीच्या खेळाप्रमाणे सत्ताबदलासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सद्याच्या कार्यकाळात फोंडा पालीकेने पाच नगराध्यक्ष पाहिले असून सहावा नगराध्यक्ष कोण? नवीन कि जुन्याचीच वर्णी लागणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
रितेश नाईक की विश्वनाथ दळवी
फोंडा पालीकेवर अविश्वास ठराव संमत होण्यासाठी आठ नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक असते. मात्र नेमक्या ठरावावरील मतदानाच्यावेळी बहुमत सिद्ध होत नसल्यामुळे अविश्वास दाखल केलेल्यावर नामुष्की ओढवलेली आहे. आजपर्यत अनेक प्रयत्नात नगराध्यक्षपदाची खुर्ची मिळू न शकलेले फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यांचे सुपुत्र रितेश नाईक हेच नगराध्यक्षदी प्रमुख असणार काय? की मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे निकटचे मानले जाणारे विश्वनाथ दळवी हे नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर हक्क सांगणार याची उत्सुकता फोंडावासियांना लागून राहिली आहे.