वरिष्ठ अधिकाऱयांनी कारवाई करण्याची मागणी
प्रतिनिधी / फोंडा
बोरी येथील एका मालमत्तेच्या वादातील संशयित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या कानाखाली तपास अधिकाऱयाने थप्पड लावल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. त्यामुळे संशयितावर बांबोळी येथे गोमेकॉत उपचारांसाठी जाण्याची वेळ आली. फोंडा पोलीस स्थानकातील शिकाऊ उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावत असलेल्या या पोलिसाचे यापुर्वीचे अनेक कारनामे प्रसिद्ध आहे. फोंडा परिसरात असंतोष व्यक्त होत असून या पोलिसावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
प्राप्त माहितीनुसार पाणीवाडा बोरी येथील एका कौटुंबिक वादात काका पुतण्यानी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून फोंडा पोलिसांनी दोन्ही गटातील संशयितांवर गुन्हा नोंदवून अटक केली आहे. मात्र तपास अधिकाऱयांने याप्रकरणी संशयित असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या कानाखाली थप्पड मारुन त्याला जखमी केले आहे. बांबोळी येथील वैद्यकीय अहवाल अजून मिळाला नसल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे. एखादय़ा गुंडाविरोधात मोर्चा उघडताना उपनिरीक्षकांचे हात गारठतात मात्र ज्येष्ठ नागरिकाविरोधात मात्र उतावळे होत असल्याचे चित्र सद्या फोंडा पोलिसस्थानकात सेवा बजावणाऱया उपनिरीक्षकांचे दिसत आहे.