कोविड रूग्णांचे मडगांव येथे स्थलांतर , उपजिल्हा इस्पितळ सामान्य रूग्णांसाठी ओपीडी
प्रतिनिधी/ फोंडा
कोरोना महामारीच्या काळात तिस्क-फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळाचे कोरोना इस्पितळ म्हणून केलेले रूपांतर हटविण्यात आले असून पुर्ववत उपजिल्हा सामान्य रूग्णांसाठी सुरू झाले आहे. काल रविवार 3 जानेवारीपासून केज्युलिटी विभाग सामान्य जनतेच्या वैद्यकीय सेवेसाठी खुले करण्यात आले आहे. आज सोमवार 4 जाने. पासून इस्पितळ पुर्ववत सर्व शस्त्रक्रिया व वैद्यकिय उपचारासह ओपीडी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती फोंडा उपजिल्हा इस्पितळाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. विकास कुवेलकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
उपजिल्हा इस्पितळ सामान्य रूग्णांसाठी सुरू करण्यापुर्वी दोन दिवस पुर्णत: सेनिटायझ व सर्व सुरक्षेच्या उपाययोजना अंमलात आणलेल्या असून येथे भेट देणाऱया सामान्य रूग्णांनी निर्धास्त रहावे असे डॉ. कुवेलकर म्हणाले. 10 ऑगस्ट 2020 पासून गेले साडेचार महिने या इस्पितळाचा वापर कोविड इस्पितळ म्हणून करण्यात येत होता. येथील काही अत्यवाश्यक सेवा फर्मागुडी येथील आयएमएच्या दिलासा इस्पितळात हलविण्यात आल्या होत्या.
द. गोव्यासाठी मडगांव येथे कोविड इस्पितळ
आता उपजिल्हा इस्पितळातील सर्व कोरोना रूग्णांना कोविड इस्पितळ मडगाव येथील इएसआय कोविड इस्पितळात स्थलांतरीत करण्यात आले असून दक्षिण गोव्यात कोविड रूग्णांसाठी ते एकमेव इस्पितळ राहणार आहे. त्यामुळे फर्मागुडी येथे स्थलांतरीत करण्यात आलेले उपजिल्हा इस्पितळ पुर्ववत तिस्क फोंडा येथे आज 4 जाने. पासून सर्व वैद्यकिय उपचारांसाठी खुले करण्यता आले आहे. महामारीच्या काळात फोंडा व आसपासच्या रूग्णांना 220 खाटीच्या उपजिल्हा इस्पितळातून 25 खाटीच्या दिलासा इस्पितळात आपत्कालीन व तात्पुरत्या ओपीडी सेवा पुरविल्या जात होत्या.
शस्त्रक्रिया, एक्स रे व इतर रोगाच्या निधानासाठी रूग्णांना धारबांदोडा किंवा गोमेकॉत जावे लागत होते. उपजिल्हा इस्पितळ पुर्ववत सुरू झाल्यामुळे सामान्य रूग्णांना तात्काळ सेवा उपलब्ध होणार आहे. गेले साडे चार महिने सामान्य लोकांना वैद्यकिय उपचारासाठी झालेल्या गैरसोयीबाबत डॉ. कुवेलकर यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. तसेच उपजिल्हा इस्पितळात सुरू असलेली कोरोना चाचणी केंद्र पुर्वीप्रमाणे तळमजल्यावर सुरू राहणार आहे.