13 ठिकाणाहून 9 वजनकाटय़ासह 80 हजारांचा माल जप्त : शिरोडा, बांदोडा, फर्मागुडी, म्हार्दोळ भागात कारवाई
प्रतिनिधी /फोंडा
वजन माप खाते फोंडा विभागातर्फे शिरोडा, फर्मागुडी, बांदोडा, म्हार्दोळ भागात एकूण 13 ठिकाणी छापा मारून सुमारे रू. 80 हजाराचा माल व 9 नुतनीकरण न करण्यात आलेले वजनकाटे जप्त करण्यात आले. मंगळवार 22 रोजी ही कारवाई करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार वजन माप खात्यातर्फे फेब्रुवारी महिन्यात फोंडा तालुका कार्यक्षेत्रात एकूण 299 ठिकाणी धडक कारवाईचे धाडसत्र आरंभले असल्याची माहिती निरीक्षक डिकॉस्ता यांनी दिली. त्यापैकी 47 जणांवर तक्रारी नोंदविलेल्या आहेत. चार दिवसापुर्वी उसगांव, तिस्क, बाराजण, मारवासडा, पिळये या भागातून सुमारे नुतनीकरण न करण्यात आलेले सुमारे 23 वजनकाटे जप्त करण्यात आले होते. त्यानंतर चार दिवसात सलग दुसरी मोठी कारवाई करताना शिरोडा येथील एका सुपर मार्केट येथे पाकीदबंद कडधान्याची विक्री करताना कोणतेचे नियम पाळले नसल्याच टपका ठेवला आहे. फर्निचर, किराण दुकान, भाजीविक्री केंद्र अशा विविध दुकानातून कडधान्यासह सुमारे रू. 80 हजाराचा माल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच फेसमास्काची किंमत अव्वाच्या सव्वा दरात विक्री करण्यात येत असल्यामुळे संशयिताविरोधात तक्रार नोंदविण्यात आलेली आहे. वजन माप खात्याचे अधिकारी प्रसाद शिरोडकर, अरूण पंचवाडकर, देमू मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शुबर्ट डिकॉस्ता यांच्या टिमने ही कारवाई केली.