फोंडा नागरिकांतर्फे एसजीपीडीए अधिकाऱयाला निवेदन सादर
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा शहरासाठी असलेल्या नियोजित बाहय़ विकास आराखडा (ओडीपी) वर फोंडयातील सुज्ञ नागरिकांनी काही महत्वाच्या सुचना चर्चेअंती सुचविल्या. काल बुधवारी झालेल्या या चर्चेदरम्यान संबंधीत आरखडय़ात काही प्राथमिक दुरुस्त्याचे निवेदन दक्षिण गोवा पीडीएचे सदस्य सचिव रणजीत बोरकर यांना सुपुर्द केले.
यावेळी फोंडा पालीकेचे नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर, माजी नगरसेवक सुनिल देसाई, ज्येष्ठ पर्यावरणवादी तथा वास्तूविशारद कमलाकर साधले, उदय डांगी, मारीयो कुलासो, विनायक नायक, सुभाष सिरसाट, नगरसेवक व्यकटेश उर्फ दादा नाईक व पालीका कर्मचारी उपस्थित होते. फोंडयातील जागृत नागरिकांतर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनात आराखडय़ामध्ये दाखविण्यात आलेला कंण्णेव्हाळ ओहोळाजवळून नवीन रस्त्यासाठी प्रस्ताव का? असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. ज्यामुळे भातशेतीची नासाडी होऊ नये म्हणून दुरुस्ती सुचविण्यात आलेल्या आहेत. शहरातील मोकळय़ा जागा, व्यावसायिक प्रकल्प, रहिवासी प्रकल्प व अन्य प्रकल्पांचा जागा अधोरेखीत करताना महत्वाच्या सुचना केलेल्या आहेत. शहरातील वाढत्या पार्किंगसाठी केवळ एक मल्टीलेवल पार्किंगची सुविधा करण्याऐवजी सारासार विचार व्हायला हवा. दादा वैद्य चौक परिसर व जुने बसस्थानक परिसराचे सौदर्य जपून ते पुढील पिढीसाठी राखून ठेवण्यासाठी अंत्यत गरजेची बाब असल्याचे म्हटले आहे. ओडीपी अधिसुचना जारी झाल्यानंतर 60 दिवसाच्या कार्यकाळात नागरिकांसाठी सुचना किंवा हरकतीसाठी दाखल करण्याची मुभा मिळणार आहे. त्यानुसार जनसुनावणीही घेण्यात येणार असल्याची माहिती बोरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.