प्रतिनिधी / फोंडा
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर सायंकाळी 7 ते सकाळी 7 वा. पर्यंत पुढील आठ दिवस कडक निर्बंध घालण्यात आल्याने सोमवारपासून फोंडय़ात त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरु झाली आहे. सोमवारी फोंडय़ातील मुख्य बाजारपेठेसह शहरातील सर्व दुकानांची शटर्स सायंकाळी 7 वा.च्या ठोक्याला बंद झाली. काही ठिकाणी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. औषधालये व या निर्बंधातून वगळण्यात आलेली आस्थापने तेवढे सुरु होती.
एरवी सायंकाळी 6 वा. नंतर गजबजणारा फोंडय़ातील बाजार सोमवारी सायंकाळी सामसूम झाला होता. शहरातील रस्त्यांवरही तुरळक वाहतूक दिसत होती. फोंडा बाजारपेठेतील बहुतेक व्यापारी व अन्य दुकानदारांनी सायंकाळी 7 वा. पूर्वीच आवराआवर सुरु केली होती. भाजी बाजारातील काही व्यापाऱयांना या निर्बंधाची पूर्वकल्पना नसल्याने ते निवांत होते. बाजारपेठेत पोलीस दाखल होताच फळवाले, भाजी विक्रेते व मसाला विक्रेत्यांनी आपली दुकाने पटापट बंद केली. काही वेळातच बाजारपेठ पूर्ण खाली झाली. रात्री 8 वा. नंतर शहरातील सर्व रस्ते सामसूम झाले होते. पुढील आठ दिवस हे निर्बंध लागू होणार असल्याने सायंकाळनंतर लोकांनी बाजारात गर्दी करु नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.