प्रतिनिधी/ बांदा
फोंडा हवेलीनगर येथे घरात लपवून ठेवलेल्या गोवा बनावटीच्या दारू साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कणकवली पथकाने कारवाई केली. या कारवाईत विक्रीसाठी आणलेली 2 लाख 48 हजार 640 रुपयांची गोवा बनावटीची दारू ताब्यात घेतली आहे. तर याप्रकरणी प्रसाद महादेव नराम (रा. फोंडा हवेलीनगर) याच्यावर कारवाई केली आहे. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही कारवाई केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, फोंडा हवेलीनगर येथे बेकायदा गोवा बनावटीच्या दारूचा साठा असल्याचे खात्रीलायक वृत्त राज्य उत्पादन शुल्कच्या कणकवली येथील पथकाला लागली. त्यानुसार अधीक्षक बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गणेश जाधव व सहकाऱ्यांनी फोंडा येथे जात दारू साठ्यावर धाड घातली. यात विक्रीसाठी आणलेल्या गोवा बनावटीच्या दारूचे तब्बल 50 बॉक्स लपवून ठेवलेले सापडले. तर या कारवाईत एकास ताब्यात घेतले. ही कारवाई अधीक्षक बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गणेश जाधव, दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, महिला जवान स्नेहल कुवेसकर, चालक जगन राणे यांनी केली.