नगराध्यक्षपद तरले : उपनगराध्यक्ष अडचणीत मतदानाला सर्व पंधराही नगरसेवक अनुपस्थित
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मतदानाच्यावेळी 15 पैकी एकही नगरसेवक उपस्थित न राहिल्याने बारगळला. भाजपामधील 7 नगरसेवकांनी हा अविश्वास दाखल केला होता. ठराव बारगळण्यापूर्वीच भाजपाचे उपनराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर यांच्याविरुद्ध 8 नगरसेवकांनी अविश्वास नोटीस दाखल करीत भाजपाला दुहेरी धक्का दिला.
काल सोमवारी सकाळी नगराध्यक्ष कोलवेकर यांच्यावरील अविश्वास ठरावावर चर्चा व मतदानासाठी बैठक बोलावण्यात आली होती. ठरावावर स्वाक्षऱया केलेले भाजपाचे नगरसेवक रितेश नाईक, विश्वनाथ दळवी, उपनगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर, आनंद नाईक, यतीश सावकार व विलियम आगियार हे सातपैकी सहाजण नगरपालिकेत पोचले. मात्र नगरसेविका अर्चना डांगी व ज्या आठव्या नगरसेवकाच्या प्रतिक्षेत ते होते, तो नगरसेवक आलाच नाही. निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित असलेले उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी मुख्याधिकारी सागर गावडे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया सुरु केली. निर्धारीत वेळेत मतदानासाठी वरील सातजणांसह पंधरापैकी एकही नगरसेवक सभागृहात उपस्थित राहिला नाही. निर्वाचन अधिकाऱयांनी पालिका कायद्यातील कलम 8 चा वापर करीत बैठक दुसऱया दिवशी मंगळवारपर्यंत तहकूब केल्याचे जाहीर केले. मात्र नंतर त्यांनी आपला हा निर्णय बदलून अविश्वास ठराव बारगळय़ाचे अधिकृतरित्या सांगितले.
नगराध्यक्ष कोलवेकर यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अविश्वास नोटीसीवर 15 पैकी 7 जणांच्या स्वाक्षऱया होत्या. बहुमतासाठी 8 नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक असल्याने हा आठवा नगरसेवक आयत्यावेळी हाती न लागल्याने भाजपाची नाचक्की झाली. नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर हे बैठक संपल्यानंतर पालिकेत दाखल झाले. त्यांच्या समर्थकांपैकी एकही नगरसेवक पालिकेजवळ फिरकला नाही.
दरम्यान, नगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव बारगळल्याचे जाहीर होण्यापूर्वीच उपनगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर यांच्याविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दाखल करण्यात आली. खुद्द भाजपाच्या समर्थक असलेल्या नगरसेविका अर्चना डांगी यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन या अविश्वास नोटीसीवर स्वाक्षरी केल्याने भाजपाचे उपनगराध्यक्षपद अडचणीत आले आहे.
नगरसेविका डांगी यांची डबल गेम
अर्चना डांगी या भाजपाच्या नगरसेविका आहेत. नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर यांच्याविरुद्ध गेल्या 27 सप्टेंबर रोजी अविश्वास नोटीस दाखल करण्यात आली, त्यावर तिची स्वाक्षरी आहे. सोमवारी दुपारी उपनगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर यांच्याविरुद्ध जी अविश्वास नोटीस दाखल करण्यात आली, त्यावरही डांगी यांनी स्वाक्षरी करून डबल गेम केलेला आहे. शांताराम कोलवेकर यांच्या नगराध्यक्षपद निवडणुकीच्यावेळी डांगी यांनी क्रॉस मतदान केल्याची चर्चा होती. आता उघडपणे त्यांनी भाजपा विरोधात जात आपली नाराजी व्यक्त केली आहे. विरेंद्र ढवळीकर हे तीन महिने उपनगराध्यक्ष राहिल्यानंतर डांगी यांना संधी देण्याचे ठरले होते. पण तीन महिने उलटूनही त्यांच्यासाठी हे पद खाली न केल्याने त्यांनी हा डाव साधल्याची चर्चा आहे.
फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यांचे पुत्र नगरसेवक रितेश नाईक यांचे नगराध्यक्षपद मागच्यावेळी निश्चित झाले होते. त्यावेळी भाजपाचे खंदे कार्यकर्ते असलेल्या शांताराम कोलवेकर यांनी पक्षाविरोधात बंड करीत रितेश नाईक यांच्याविरोधात अर्ज भरला व मगो आणि गोवा फॉरवर्डच्या पाठिंब्यावर नगराध्यक्ष बनले. कोलवेकर यांच्यावर अवघ्या चार महिन्यात अविश्वास दाखल करून रितेश नाईक यांना पुन्हा नगराध्यक्ष बनविण्याचा डाव उधळला गेला आहे. फोंडा पालिकेवरील सत्तांतराच्या राजकारणात भाजपाला पुन्हा एकदा शह देत शांताराम कोलवेकर यांनी बाजी जिंकली. भाजपाचे पदाधिकारी सुनिल देसाई यांनी या घडामोडींवर बोचरी प्रतिक्रिया दिली. कोलवेकर हेच नगराध्यक्ष कायम राहावेत अशी सर्व नगरसेवकांची इच्छा असावी. त्यामुळेच पंधरापैकी एकही नगरसेवक अविश्वास ठरावावरील मतदानाला उपस्थित राहिला नसावा, असे ते म्हणाले.
अन् शांताराम कोलवेकर भडकले
निर्वाचन अधिकारी अजय गावडे यांनी सुरुवातीला बैठक तहकूब केल्याच्या निर्णयावर नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर प्रसारमाध्यमांसमोर बोलताना भडकले. सरकारच्या दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला. साखळी नगरपालिकेवरील गलिच्छ राजकारण फोंडा पालिकेवरही खेळले जात असल्याची जोरदार टिका त्यांनी केली.