रितेश नाईक यांची स्वप्नपुर्ती होईल का ?
प्रतिनिधी / फोंडा
फोंडा पालीकेचे नगराध्यक्ष व्यंकटेश उर्फ दादा नाईक यांनी काल मंगळवारी दुपारी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा पणजी येथील पालीका प्राधिकरण संचालकांच्या सुपुर्द केला. तरीही राजीनामा अर्ज मागे घेण्यासाठी त्यांना येत्या सात दिवासांची मुदत आहे. फोंडा पालिका 15 नगरसेवकांची आहे. 29 ऑगस्ट 2019 रोजी व्यंकटेश नाईक यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली होती. व्यंकटेश नाईक यांना 12 नगरसेवकांचा तर विरेंद्र ढवळीकर यांना 3 नगरसेवकांचा पाठिंबा लाभला होता. व्यंकटेश नाईक यांचं राजीनामा देण्यामागील राजकारण स्पष्ट नसले तरी आमदार रवी नाईक यांचे पुत्र रितेश व रॉय नाईक यांचा भाजपा प्रवेश झाल्यानंतर फोंडा पालिकेवर सत्ताबदल निश्चित असल्याचे म्हटले जात होते. रितेश नाईक यांच्या भाजपाप्रवेशानंतर अन्य काही नगरसेवक व आनंद नाईक, विलीयम आगियर यांचेही पाठबळ रितेश यांना लाभणार आहे. त्य़ावर येत्या काळात शिक्कामोर्तब होते की परत एकदा रितेश यांना नगरध्यक्षपद हुलकावणी देत व्यंकटेश नाईक वरचढ ठरतात यावर सर्व फोंडावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.