नेते श्रीपादभाऊ, सुदिननंतर रवी पॉझिटीव्ह
प्रतिनिधी/ फोंडा
फोंडा परिसरातील बहुतेक कार्यक्रमात एकसंध दिसणारी पित-पुत्राची जोडगोळी फोंडय़ाचे आमदार रवी नाईक व त्याचे फोंडा नगरसेवक असलेले पुत्र रितेश नाईक ऐन चतुर्थीच्या उत्सवकाळी काल शुक्रवारी कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहे. गुरुवारी खडपाबांध येथे झालेल्या स्व. राजीव गांधी जयंती कार्यक्रमात आमदार रवी नाईक यांनी मुद्दामहून अनुपस्थित राहून दक्षता घेतली होती. सध्या पितापुत्रांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार होम क्वारंटाईन राहणे पसंत केले आहे. मागील पाच दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी तपासणी करून घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
फोंडा तालुका राजकीय पुढाऱयांना कोरोनाची लागण झाल्याची ही तिसरी घटना असून यापूर्वी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक त्यानंतर मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर व त्यांच्या पत्नी कोरोनाबाधित झाल्या होत्या. रवी नाईक व रितेश नाईक दोघेही प्रत्येक कार्यक्रमात बरोबरीने उपस्थिती लावत असत. रितेश यांच्या भाजप प्रवेशानंतरही यात खंड पडला नव्हता. सद्यपरिस्थितीत फोंडा पालिकेत सत्ताबदलाचे वारे असून रितेश नाईक यांचे नाव नगराध्यक्षपदी आघाडीवर आहे. मात्र रितेश कोरोनाबाधित झाल्यामुळे पालिकेची नगराध्यक्षपद निवडणूकही पंधरा दिवस पुढे ढकलण्याची चिन्हे दिसत आहे.