प्रतिनिधी /फोंडा
राज्यात कडाक्याची थंडी सुरु असतानाच सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसाने अचानकपणे हजेरी लावली. फोंडा शहरासह माशेल, केरी, सावईवेरे, बोरी व अन्य काही भागांमध्ये कमी अधीक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. माशेल येथे मालिनी पौर्णिमा जत्रोत्सवानिमित्त फेरी भरली असून अचानक कोसळलेल्या पावसाच्या सरींमुळे दुकानदार व भाविकांची तारांबळ उडाली.
यंदा उशिरापर्यंत लांबलेल्या पावसाचा जोर दिवाळी व तुळशी विवाहापर्यंत कायम होता. त्यामुळे हिवाळा लांबला. डिसेंबर अखेरपर्यंत थंडीची कुठलीच चिन्हे नव्हती. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून दाट धुके व थंडीची चाहूल लागली व गेल्या आठवडय़ाभरात कडाक्याच्या थंडीची लाट आली. गेले दोन दिवस थंडीचा हा कडाका किंचित ओसरुन हवामान दमट झाले होते. सोमवारी दिवसभर हवामान कोरडे राहिले व सायंकाळी अचानकपणे पावसाच्या सरींनी जोरदार हजेरी लावली. साधाराण अर्धातास कोसळलेल्या या सरींमुळे शहरातील रस्ते चिंब भिजून गेले. फोंडा शहराबरोबरच तालुक्यातील विविध गावांमध्ये पावसाने किरकोळ हजेरी लावली. समाज माध्यमांवर बराचवेळ पावसाच्या या अप्रुपाचेच फोटो व व्हीडिओ फिरत होते.