फलोत्पादन गाळय़ात मात्र रू. 62 प्रति किलो
प्रतिनिधी/ फोंडा
ग्राहकांवर रूसलेला कांदा अजूनही आग ओकत आहे. गगनाला भिडलेल्या कांद्याचे खुल्या बाजारातील भाव अजूनही शंभरीवर अडून आहे. फोंडय़ातील खुल्या बाजारात अजूनही उत्तम दर्जाचा कांदा 80 ते 100 प्रति किलो या दराने विकला जात आहे. मागील दोन महिन्यापासून राज्यभरात कांदामुळे भुर्दड सोसाव्या लागल्याने हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीवर फलोत्पादन महामंडळाने काही प्रमाणात नियंत्रण ठेवताना गोवेकरांना मुबलक दरात कांदा उपलब्ध केलेला आहे.
फलोत्पादन महामंडळाच्या स्टॉलवर काल शुक्रवारी रू. 62 प्रति किलो अशा दराने विकला जात होता. फलोत्पादन महामंडळाने सोमवारपासून दिवसेंदिवस कमी किमतीत उपलब्ध केलेला कांदा मिळवण्यासाठी सकाळपासूनच ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत हेते. प्रत्येक स्टॉलवर दिवसाकाठी केवळ 20 किलो कांदा उपलब्ध करण्यात आला आहे. फोंडयातील बुधवार पेठच्या आठवडी बाजारात आज बेळगावहून मोठया प्रमाणात कांदा उपलब्ध होण्याची शक्यता असल्याची माहिती येथील भाजीविक्रेत्यांनी दिली मात्र दर कसा असेल याबाबत साशंकता आहे. कारण बहुतेक बिगरगोमंतकीय या व्यवसायात असल्यामुळे त्यांनी ठरवेल त्या दराने गोवेकरांनी कांदा विकत घ्यावा अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे.