पहिल्या दिवशी शंभर जणांना पहिला डोस
प्रतिनिधी / फोंडा
फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात काल सोमवारपासून 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी साधारण शंभर नागरिकांना या लसीचा पहिला डोस देण्यात आल्याची माहिती इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास कुवेलकर यांनी दिली.
आज मंगळवारी शंभर नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात येणार असून बुधवारनंतर पोर्टलवर नोंदणी करणाऱया नागरिकांच्या लसीकरण कार्यक्रमाला सुरु होणार आहे. 60 वर्षांवरील सर्व नागरिकांना तसेच 45 वर्षांवरील प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांनाही ही लस देण्यात येणार आहे. ज्यामध्ये मधुमेही, उच्च रक्तदाब, मुत्रपिंड, हृदयविकार असलेल्या 45 व त्यावरील वयोटातील रुग्णांना लस देण्यात येईल, अशी माहिती डॉ. कुवेलकर यांनी दिली.
उपजिल्हा इस्पितळात येणाऱया नागरिकांना कोविशिल्ड ही लस देण्यात येत असून पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाणार आहे. लस घेणाऱया प्रत्येकाला प्रशस्तीपत्र देण्यात येईल. लसिकरणासाठी येताना आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पारपत्र, वाहतूक ओळखपत्र यापैकी कुठलेही एखादे ओळखपत्र घेऊन येण्याचे आवाहन इस्पितळातर्फे करण्यात आले आहे.
18 वर्षांखालील मुले, गरोदर महिला, प्रसुती होऊन मुलांना स्तनपान करणाऱया माता किंवा कुठल्याही प्रकारची ऍलर्जी असलेल्या व्यक्तीला ही लस घेता येणार नाही, अशी माहिती डॉ. कुवेलकर यांनी दिली.