भाजपाला रामराम : विधानसभेची उमेदवारीही निश्चित
प्रतिनिधी / फोंडा
फोंडा पालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक व्यंकटेश उर्फ दादा नाईक यांनी भाजपाचा राजीनामा देऊन गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केला आहे. गोवा फॉरवर्डचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांनी, ही माहिती देतानाच येत्या विधानसभा निवडणुकीत व्यंकटेश नाईक हे फोंडा मतदारसंघातील गोवा फोरवर्डचे उमेदवार असतील, अशी घोषणाही केली.
फोंडा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यंकटेश नाईक व पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत हे उपस्थित होते. व्यंकटेश नाईक यांचा रितसर प्रवेश सोहळा येत्या 4 जाने. रोजी होणार असून ते आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश करणार आहेत. केवळ फोंडा मतदारसंघातच नव्हे तर फोंडा तालुक्यातील चारही मतदारसंघांमध्ये पक्षाचा कार्यविस्तार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱया विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत युती करणार काय? या प्रश्नावर उत्तर देताना, गोव्यातील जनतेची तशी इच्छा आहे. सध्याच्या भ्रष्ट सरकारला पायउतार करण्यासाठी वेळ पडल्यास काँग्रेस सोबत युती करावी लागेल. मगो पक्षाबद्दल बोलताना मगो हा युतीसाठी विश्वासार्ह नाही. मगो नेते सुदिन ढवळीकर हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आधीन असल्याने सध्या तरी मगोशी युतीचा कुठलाच विचार नसल्याचे किरण कांदोळकर यांनी सांगितले.
भाजपाने कधीच विश्वासात घेतले नाही : व्यंकटेश नाईक
व्यंकटेश नाईक यांनी आपण भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. गेली 27 वर्षे आपण भाजपासाठी कार्य केले. मात्र त्यांनी आपल्याला कधीच विश्वासात घेतले नाही किंवा जबाबदारीचे पदही दिले नाही. मंडळाच्या बैठकांनाही आपल्याला डावलण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसमधील तिघा नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यापैकी एकाला नगराध्यक्ष करण्यासाठी आपल्याकडून सक्तीने राजीनामा घेतला गेला. जिल्हा पंचायत निवडणुकीत कुर्टीतील पराभवाला आपल्याला जबाबदार धरण्यात आले. आपण त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा दिला. फोंडय़ात युवकांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी येथील आमदार किंवा सत्ताधारी पक्षातील कुणीच प्रयत्न केलेले नाहीत. यापुढे फोंडय़ाच्या विकासासाठी व युवकांना रोजगार मिळावा यासाठी आपण गोवा फोरवर्डमध्ये प्रवेश करीत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
दुर्गादास कामत यांनी गोवा फोरवर्डची फोंडय़ात नव्याने बांधणी करणार असल्याचे सांगून यापुढे व्यंकटेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली युवा, महिला अशा विविध समित्या स्थापन करणार असल्याचे सांगितले. गोवा फोरवर्डमधून डावलण्यात आलेले राजेश वेरेकर हे पक्षाशी एकनिष्ठ नव्हते व त्यांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी पक्षाचा वापर केल्याचा आरोप केला.