आज विक्रेते कुठे बसणार अंडग्राऊंड पार्किग की जुन्या जागेवर?
मुख्याधिकाऱयांच्या भूमिकेवर लक्ष
प्रतिनिधी / फोंडा
फेंडा शहरात मासळी मार्केट भरविण्यासाठी मासळी विक्रेते, पालीका मंडळ व मुख्याधिकारी अशी रस्सीखेच असून आज मंगळवारी मासळी विक्रेते कुठे बसणार यावर सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. फोंडा पालीकेने कोरोना काळात मासळी विक्री बंद असल्याच्या कारणाने मार्केटचे दुरूस्तीसाठी काम हाती घेतलेले आहे. मार्केट बंद ठेवण्याचे 11 मे रोजी आदेश जारी केलेले असून त्याऐवजी मासळी विक्रेत्यांची सोय अंडरग्राऊड वाहन पार्किगच्या जागेवर तात्पुरती करण्यात आलेली आहे.
पावसाळय़ात मासळी विक्रेत्यांचे हाल होऊ नये यासाठी अंडरग्राऊंड वाहन पार्किगच्या अर्ध्या जागेत मासळी विक्रेत्यांची सोय केलेली आहे. तरीही ती न जुमानता काही विक्रेत्यांनी काल सोमवारी आपल्या पुर्वीच्या जागेवर बसण्याचे धाडस दाखविलेले आहे. यावर पोलिसांनी हटकविल्यावर बेधडकपणे मुख्याधिकारी केदार नाईक यांनी बसविण्यासाठी परवानगी दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पालीका विरोधी मुख्याधिकारी असा प्रकार दिसून येत आहे. यावर मुख्याधिकाऱयांनी चुप्पी साधलेली आहे.
मासळीविक्रेत्यांची सोय अंडरग्राऊंड पार्किगमध्ये
कोरोना काळात फोंडा शहरात मासळी विक्रेत्यांचे अतिक्रमण होऊ लागलेले आहे. नाकानाक्यावर मासळी विक्रीच्या प्रकारामुळे दुर्गधीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे सर्व मासळी विक्रेत्यांना एअरपोर्ट रोडवर बसविण्याचे ठरविण्यात आले होते. हे आदेश न पाळता मासळी विक्रेत्यांनी आपल्या सोयीच्या ठिकाणी बसविण्याचे सत्र आरंभले. त्य़ानंतर रविवारी सकाळी काही विक्रेत्यांवर पालीकेने कारवाई केल्यामुळे गेंधळ निर्माण झाला. त्यानंतर झालेल्या बैठकीत यशस्वी तोडगा काढताना ऐअरपोर्टच्या उघडय़ावरील जागेऐवजी मार्केट प्रकल्पाच्या अंडरग्राऊंड वाहन पार्किगची जागेवर बसविण्याची सोय पालीकेतर्फे करण्यात आली. काल सोमवारी काही मासळी विक्रेत्यांनी जुन्या दुरूस्तीकामासाठी टाईल्स काढलेल्या पुर्वीच्या मासळी बाजारात ठाण मांडून व्यवसाय थाटल्याचे दिसून आले. यावर विचारपूस केली असता मुख्याधिकारी केदार नाईक यांनीच तसे आदेश दिल्याचे सांगण्यात आले.
आदेश कोणाचे पाळणार मुख्याधिकाऱयांचे की नगराध्यक्षाचे ?
यावेळी नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की उघडयावर मासळी विक्री करणाऱया विक्रेत्यांना अंडरग्रांऊड पार्किगच्या शेडमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. यासाठी एकूण 137 विक्रेत्यांचे यादी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याबरोबर गावठी मासळी विकेत्यासाठी वेगळी सोय करण्यात आल्याची माहिती व्यंकटेश नाईक यांनी दिली. दुरूस्तीकाम सुरू असलेल्या मासळी बाजारात बसू नये अशी सक्त ताकीद पालीकेतर्फे देण्यात आलेली आहे तसेच यासंबंधी पालीकेने ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. बहुतेक व्यापाऱयासाठी 1.65 चौ.मि. जागा उपलब्ध करण्यात आलेली आहे. काही व्यापाऱयांना 4 चौ.मि. अशा मोठय़ा जागेची अपेक्षा असून ते शक्य नसून जागा शिल्लक राहिल्यास त्यावर विचार करण्यात येईल असे सांगण्यात आले या शर्तीवर रविवारी सर्व व्यापाऱयांनी संमती दर्शविली होती. तरीही काल सोमवारी काही विक्रेत्यांनी पुर्वीच्या मासळी बाजारात ठाण मांडून बसलेले असून याप्रकरणी मुख्याधिकाऱयांनी परवानगी दिलेली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्य़ामुळे सीईओ पालीका मंडळाचे ऐकते की स्वतः निर्णय घेतात यावर सर्वाचे लक्ष राहून राहिलेले आहे.
आज मंगळवारी मासळीविक्रेते कुठे बसणार, जुन्या जागेवर बसल्यावर पालीका कर्मचारी कोणती कारवाई करणार, तसेच मुख्याधिकारी यावर कोणत्या कारवाईचे आदेश देतात यावर पालीका मंडळाचे लक्ष लागून राहिलेले आहे.