प्रतिनिधी /फोंडा
गोवा राज्य सरकार व फोंडा तालुका अंत्रुज शिमगोत्सव समिती आयोजित शिमगोत्सव शनिवार 19 मार्च रोजी दुपारी 3.30 वा. तिस्क-फोंडा येथून प्रारंभ होणार आहे.
शिमगोत्सवात रोमटामेळ, चित्ररथ, ढोलताशे पथक, लोकनृत्य, वेशभूषा अशा विविध रंगाने भरलेला शिमगोत्सव शनिवारी फोंडय़ात होणार असून पारंपारिक रोमटामेळ पौराणिक धर्तीवर आधारीत चित्ररथ, पारंपारिक लोकनृत्य तसेच ज्येष्ठ व कनिष्ठ गटाकरता वेशभूषा हे या शिमगोत्सवाचे आकर्षक राहणार आहे.
फोंडा तालुका अंत्रुज शिमगोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आमदार रवी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समितीचे अध्यक्ष आमदार गोविंद गावडे असणार आहेत. त्याशिवाय आमदार सुदिन ढवळीकर, सुभाष शिरोडकर, विनय तेंडूलकर, ऍड नरेंद सावईकर, अशोक नाईक, गीताली तळावलीकर यांची उपाधक्षपदी तर सरसचिव म्हणून विश्वनाथ दळवी, सचिव गुरूनाथ नाईक, खजिनदार किशोर नाईक यांचा सहभाग आहे.
रोमटामेळ चित्ररथ व लोकनृत्य स्पर्धेत सहभागी होऊ इच्छूकांसाठी पथकांना छापिल अर्ज फोंडा-तिस्क येथील तालुका कार्यालयात 17 मार्च पासून उपलब्ध होणार आहेत. तसेच वेशभूषा स्पर्धा दोन गटात होणार असून वय 5 ते 14 पर्यंत कनिष्ठ वर्गाकरता आणि वय 15 वरील त्याशिवाय ज्येष्ठ वर्गाकरता होणार आहे. या सर्व स्पर्धाकरता वेगवेगळी बक्षिसे दिली जाणार असून ढोल ताशे पथकांना मानधन दिले जाईल. तसेच बक्षिसे न मिळालेल्या पथकांनाही मानधन दिले जाईल. शिमगोत्सव सहभागी होणाऱया पथकांनी तसेच वेशभूषा स्पर्धकांनी 19 रोजी दुपारी 3 वा. आपले अर्ज जगन्नाथ नाईक 9765580769 याच्यांकडे पोहोचते करावे असे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.