प्रतिनिधी / फोंडा
फोंडा तालुक्यात शासकीय पातळीवरील राज्यस्तरीय शिमगोत्सव मिरवणूक 30 मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या शिमगोत्सवात स्वयंचलीत चित्ररथ देखावा, रोमटामेळ, लोकनृत्य व वेशभूषा या स्पर्धा होणार आहेत. फोंडा तालुका शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी काल बुधवारी झालेल्या आयोजन समितीच्या बैठकीत ही माहिती दिली. शिमगोत्सव कार्यक्रमाची रुपरेषा व आयोजनासंबंधी बैठकीत आढावा घेण्यात आला.
राजीव गांधी कला मंदिरमध्ये झालेल्या या बैठकीला आयोजन समितीचे कार्याध्यक्ष फोंडय़ाचे आमदार रवी नाईक, सचिव नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, खजिनदार उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक तसेच शांताराम कोलवेकर, अशोक नाईक, हनुमंत नाईक, संदीप खांडेपारकर हे अन्य पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
26 मार्चला श्री महालसा देवीला नमन
परंपरेनुसार 26 मार्च रोजी सायं. 4 वा. म्हार्दोळ येथील श्री महालसा देवीला नमन घालून शिमगोत्सवाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. प्रियोळ येथील खेडेकर दहाजण समाजाच्या रोमटामेळ मिरवणूकीसह हा नमनाचा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी 25 मार्च रोजी सायं. 5.30 वा. तिस्क-फोंडा येथे शिमगोत्सव कार्यालयाचे उद्घाटन, तर 29 मार्च रोजी सायंकाळी फोंडा येथील जुन्या बसस्थानकावर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. मंगळवार 30 मार्च रोजी दु. 4 वा. तिस्क-फोंडा येथून शिमगोत्स्व मिरवणुकीला सुरुवात होईल. त्यात चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य पथकांसह व वेशभूषा कलाकारांचा सहभाग असेल. यावेळी फोंडा तालुक्यातील 25 लोककलाकारांचा सत्कार सोहळा होणार आहे.
चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य स्पर्धा
चित्ररथ स्पर्धेसाठी प्रथम रु. 60,000, द्वितीय रु. 50,000, तृतीय रु. 40,000 तसेच उत्तेजनार्थ प्रथम रु. 30,000, द्वितीय रु. 20,000, तृतीय रु. 15,000, चौथे रु. 12,000 व पाचवे रु. 10,000 अशी पारितोषिके देण्यात येतील. रु. 7,000 ची उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील.
रोमटामेळ स्पर्धेसाठी प्रथम रु. 35,000, द्वितीय रु. 25,000, तृतीय रु. 15,000, चौथे रु. 10,000, पाचवे रु. 8,000 व रु. 7,000 ची उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील. लोकनृत्य स्पर्धेसाठी प्रथम रु. 20,000, द्वितीय रु. 15,000, तृतीय रु. 10,000 व रु. 5,000 ची उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील. वेशभूषा स्पर्धा वरिष्ठ व कनिष्ठ अशा दोन गटात होईल. वरिष्ठ गटात प्रथम रु. 7,000, द्वितीय रु. 5,000, तृतीय रु. 3,000 व रु. 1,000 ची उत्तेजनार्थ तर कनिष्ठ गटात प्रथम रु. 2500, द्वितीय रु. 1,500, तृतीय रु. 1,000 व रु. 500 ची उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील.
चित्ररथ पथकांना आवाहन
यंदा राज्यात फोंडा, पणजी व म्हापसा या तीन ठिकाणीच शासकीय पातळीवर शिगमोत्सव होणार असून फोंडय़ातून त्याची सुरुवात होणार आहे. राज्यातील चित्ररथ पथकांनी आपले चित्ररथ तयार असल्यास आयोजकांना पूर्व सूचना देण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱया चित्ररथ पथकांनी 25 मार्चपर्यंत फोंडा नगरपालिका किंवा राजीव गांधी कलामंदिरमध्ये संपर्क साधावा.
चित्ररथ पथकांना वाढीव मानधन द्यावे : रवी नाईक
कार्याध्यक्ष आमदार रवी नाईक यांनी आयोजनासंबंधी सूचना करताना चित्ररथ ही खर्चिक बाब असल्याचे सांगून, यंदा राज्यात केवळ तीन ठिकाणी शिगमोत्सव मिरवणूक होणार आहे. त्यामुळे चित्ररथ पथकांना खर्चासाठी वाढीव मानधन देण्याचा प्रस्ताव त्यांनी सरकारसमोर मांडला आहे. स्वागत विश्वनाथ दळवी यांनी तर अशोक नाईक यांनी आभार मानले.