प्रतिनिधी /फोंडा
अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी एका बिगरगोमंतकीय युवकाला फोंडा पोलिसांनी अटक केली. सुनिलकुमार राम दोवा (वय 32, मूळ ओरीसा, म्हापसा) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 488 ग्रा. वजनाचा सुमारे रू. 48 हजार किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. काल सोमवारी दुपारी 2.30 वा. सुमारास फोंडा बसस्थानकाजवळ ही कारवाई करण्यात आली.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हापसा येथून संशयित युवक फोंडा बसस्थानकाजवळ अमलीपदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार फोंडा पोलिसांनी सापळा रचून ही धडक कारवाई केली. त्याच्या खांद्याला बॅग लटविण्यात आली होती. साधारण 488 ग्राम वजनाच्या गांजासह त्याला ताब्यात घेण्यात आले. निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परेश सिनारी, हवालदार केदारनाथ जल्मी, पोलिस शिपाई सिद्धेश गावस, विठ्ठल नाईक, अमेय गोसावी यांनी ही कारवाई केली. कोरोनाकाळात अमलीपदार्थाच्या हालचाली थंडावल्या होत्या. फोंडय़ात पुन्हा अमलीपदार्थाची विक्रीप्रकरणे वेग घेऊ लागली आहे त्या दिशेनेही सद्या कसून तपास सुरू आहे. याप्रकरणी संशयिताविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवून त्याला पोलिस कोठडीत रवनगी करण्यात आली आहे.