इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथील भगतसिंग उद्यान समोरील गणेश फौंड्रीत इलेव्हेंटर मशीनच्या पट्यामध्ये सापडून एक कामगार जागीच ठार झाला. योगेश अजित बडीगेर वय 25, मूळ रा. एकसंबा, ता. चिकोडी, जि. बेळगाव, सध्या रा. डॉ. लांडे हॉस्पिटलनजीक, भोने माळ, इचलकरंजी असे त्याचे नाव आहे. हा एकुलता एक आहे. ही घटना बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे.
पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती, भगतसिंग उद्यान समोरील गणेश फौंड्रीतमध्ये मृत योगेश बडीगेर हा युवक गेल्या एक महिन्यापासून ठेकेदार पद्धतीने फौंड्रीत वाळू व केमिकल मिश्रण करण्याच्या ठिकाणी काम करीत होता. बुधवारी तो नेहमी प्रमाणे काम करीत होता. याच दरम्यान दुपारी 12.30 च्या सुमारास इलेव्हेंटर मशीनच्या पट्यामध्ये त्याचा काम करीत असताना हात सापडला. त्यामुळे तो मशीनमध्ये ओढला गेल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
याची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन, मृतदेह शवविच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात पाठवला. या घटनेची माहिती समजताच योगेश बडीगेर याच्या नातेवाईकांनी व मित्र मंडळींनी रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे आयजीएमच्या परिसरात गर्दी झाली होती.