जान्हवी पाटील/ रत्नागिरी
कोरोना संसर्गाशी सर्वात पुढच्या फळीत लढणाऱया कर्मचारी व अधिकाऱयांना सर्वप्रथम कोरोनाची लस मिळणार आहे. या ‘प्रंट लाईन वर्कर्स’ चा डेटा तयार करण्यात आला आहे. जिह्यात आरोग्य यंत्रणेच्या शासकीय व खासगी अशा सुमारे 10 हजार 265 कर्मचाऱयांचा या प्राथमिक यादीत समावेश आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता असून अंतिम यादी जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लसीसाठी सर्वत्र अहमहिका सुरु आहे. जी लस प्रथम उपलब्ध होईल ती देण्याची पूर्वतयारी सुरु झाली आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी गत आठवडय़ात जिल्हा प्रशासनाचा या बाबत आढावा घेत आवश्यक सूचनाही दिल्या होत्या. या अनुषंगाने जिल्हा आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. अधिनस्थ यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी तसेच आय. एम. ए. व संलग्न यंत्रणेतील सर्वांची माहिती संकलनाचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. लसीचा साठा ठेवण्यासाठी कोल्ड स्टोअरेज, लसीकरण केंद्रांची संख्या आदी नियोजन सुरू झाले आहे. शासनाने 23 ऑक्टोबर रोजी या बाबतच्या सूचनाही जारी केल्या होत्या.