पॅरिस
पाठीच्या दुखण्याने त्रस्त असलेल्या जो-विल्प्रेड त्सोंगाने घरच्या मैदानावरील प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेसह यंदाच्या पूर्ण हंगामात आपण आणखी खेळू शकणार नसल्याची घोषणा बुधवारी केली. 35 वर्षीय त्सोंगा यंदा जानेवारीतील ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेनंतर एकही व्यावसायिक लढत खेळू शकलेला नाही. त्या स्पर्धेतील पहिल्याच फेरीत त्सोंगाला ऍलेक्सेई पॉपरिनविरुद्ध माघार घ्यावी लागली. त्सोंगाची त्या लढतीत 6-7 (5), 6-2, 6-1 अशी स्थिती होती.
पाठदुखीची समस्या जैसे थे राहिल्यास मला प्रेंच स्पर्धेत खेळता येणारच नाही. शिवाय, पूर्ण हंगामाला देखील मुकावे लागेल, अशी स्थिती होती. त्या पार्श्वभूमीवर मी अधिक धोका घेणे टाळले, असे तो म्हणाला. यंदाची प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा दि. 27 सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे.
‘यंदाच्या हंगामात मी खेळू शकणार नाही, हे स्पष्ट आहे. पण, 2021 च्या नव्या हंगामात मी ताज्या दमाने कोर्टवर उतरेन. पुनरागमन केल्यानंतर आणखी सरस खेळ साकारण्याचा माझा निर्धार आहे’, असे त्सोंगाने नमूद केले. त्सोंगाने 2008 मेलबर्न ओपन ग्रँडस्लॅमच्या उपजेतेपदापर्यंत मजल मारली तर दोनवेळा प्रेंच स्पर्धेत तो उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. जागतिक क्रमवारीत तो 52 वा मानांकित आहे.
‘पुनरागमन करणे आणि जागतिक स्तरावरील अव्वलमानांकित खेळाडूंचा नव्याने सामना करणे, त्यांच्याविरुद्ध संघर्षमय खेळ साकारणे, हे माझे स्वप्न असेल’, असे त्याने येथे सांगितले.