वृत्तसंस्था/ पॅरीस (फ्रान्स)
फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील विद्यमान विजेत्या फ्रान्स संघातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा हुकमी फुटबॉलपटू करीम बेन्झेमा याला स्नायू दुखापतीमुळे कतारमध्ये रविवारपासून सुरू झालेल्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतून बाहेर पडावे लागत आहे.
या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी शनिवारी फ्रान्सचा फुटबॉल संघ सराव करीत असताना बेन्झेमाच्या डाव्या पायाच्या मांडीचा स्नायू दुखावला गेला. या दुखापतीमुळे बेन्झेमाला सातत्याने वेदना होऊ लागल्या. मांडीचा स्नायू प्रमाणापेक्षा अधिक ताणला गेल्याने बेन्झेमाची ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दुखापतीमुळे बेन्झेमा या स्पर्धेसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही, असे प्रेंच फुटबॉल फेडरेशनच्या प्रवक्त्याने सांगितले. करीम बेन्झेमा या महत्त्वाच्या स्पर्धेतून बाहेर पडल्याने फ्रान्स संघाला मोठा धक्का बसला आहे. बेन्झेमाला यापूर्वी बलून डी ओर पुरस्कार मिळाला होता. 2014 च्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत करीम बेन्झेमा हा सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू ठरला होता. पण 2018 च्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत तो फ्रान्स संघाकडून खेळला नव्हता. आता फ्रान्सच्या संघामध्ये बेन्झेमाच्या जागी विसेम बेन येडेरला संधी मिळू शकेल. तसेच फ्रान्स संघातील आणखी एक फुटबॉलपटू ख्रिस्टोपर निकुंकू यालाही गेल्या मंगळवारी सरावाच्या वेळी दुखापत झाल्याने त्याच्या जागी रँडेल कोलो म्युनीचा फ्रान्स संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे चार वर्षापूर्वी या स्पर्धेचे जेतेपद मिळवणाऱया फ्रान्स संघातील महत्त्वाचे खेळाडू पॉल पोग्बा आणि निगोलो कॅन्टी यांनाही दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकावे लागत आहे.