हिजाब घातल्यास दंड, मुख्य उमेदवाराची घोषणा
वृत्तसंस्था / पॅरिस
फ्रान्समध्ये अध्यक्षीय पदाच्या निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा 10 एप्रिल रोजी सुरू होणार आहे. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमोर यंदा उजव्या विचारसरणीच्या उमेदवार मरीन ली पेन यांचे मोठे आव्हान आहे. मागील आठवडय़ात झालेल्या सर्वेक्षणानुसार आता मॅक्रॉन आणि ली पेन यांच्यातील मतांचे अंतर केवळ 3 टक्क्यांचे आहे. याचदरम्यान निवडणुकीत हिजाबचा मुद्दा केंद्रस्थानी आहे.
पहिल्या फेरीत कुठल्याही उमेदवाराला 50 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळण्याची शक्यता नसल्याचे राजकीय जाणकारांचे मानणे आहे. याचमुळे निर्णय दुसऱया फेरीतील मतदानाच होईल. या टप्प्यात 24 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात सर्वाधिक मते मिळविणाऱया दोन उमेदवारांदरम्यान लढत होणार आहे.
हिजाबवर बंदीचे आश्वासन
आपण सत्तेवर आलो तर हिजाब परिधान करणाऱया मुस्लिमांवर दंड ठोठावू असे आश्वासन ली पेन यांनी दिले आहे. ज्याप्रकारे वाहनांमध्ये सीटबेल्ट घालणे अनिवार्य करण्यात आले आहे, त्याचप्रकारे सार्वजनिक ठिकाणी मुस्लिमांनी हिजाब घालू नये असा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे ली पेन यांनी म्हटले आहे. मरीन ली या ‘इस्लामिक कट्टरते’प्रकरणी नरमाईची भूमिका बाळगणाऱया मॅक्रॉन यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. मरीन या विजयी ठरल्यास त्या फ्रान्सच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरतील.
दोन्ही उमेदवार भारतासाठी अनुकूल
मॅक्रॉन हे भारताचे समर्थक आहेत. परंतु मरीन पेन यांची धोरण भारतासाठी अधिक अनुकूल असू शकतात. शार्ली हेब्दोवरील हल्ल्याप्रकरणी भारताची भूमिका पाहून मरीन यांनी भारताचे आणि भारतीयांचे प्रचंड कौतुक केले होते. तसेच पेन यांनी पाकिस्तानी नागरिकांना फ्रान्समध्ये प्रवेश न देण्याची मागणी केली होती.
चुरशीची लढत
मॅक्रॉन यांची ला रिपब्लिक एन मार्च पार्टी अर्थव्यवस्था आणि सामाजिक मुद्दय़ांवरील प्रचारावर भर देत आहे. काही काळापूर्वी मॅक्रॉन यांनी केलेल्या टिप्पणीमुळे इस्लामिक देश नाराज झाले होते. तर मरीन या वकील आणि नेत्या असून त्या 2011 पासून नॅशनल रॅली पक्षाच्या प्रमुख आहेत. 2017 पासून त्या संसदेच्या सदस्य आहेत. मरीन यांना टाइम नियतकालिकाने 2011 आणि 2015 मध्ये जगातील 100 सर्वात प्रभावशाली लोकांच्या यादीत सामील केले होते.
12 उमेदवार मैदानात
फ्रान्सच्या निवडणुकीत 12 उमेदवार उभे राहिले असून यात 3 महिलांचा समावेश आहे. मॅक्रॉन आणि ली पेन यांच्यासह सोशलिस्ट उमेदवार जीन-ल्यूक मेलेनचॉन देखील शर्यतीत आहेत. त्यांच्याशिवाय एरिक जेमोर, नटाली एर्टहॉद, निकोलस डूपोंट-एगनन, एन हिडॅल्गो, यानिक जॅडोट, जीन लॅसले, क्लेरी पेक्रेस, फिलिप पोटू, फॅबियन रसेल आणि एरिक फफेरबर्ग हे अध्यक्षीय उमेदवार आहेत.