1958 नंतर सामन्यात 4 गोल करणारा फ्रान्सचा पहिलाच खेळाडू
पॅरिस / वृत्तसंस्था
पुढील वर्षी कतारमध्ये होणाऱया फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी फ्रान्स व जर्मनीने आपले स्थान निश्चित केले. फ्रान्सने किलियन एम्बापेच्या 4 गोलमुळे कझाकस्तानचा 8-0 असा एकतर्फी धुव्वा उडवला तर बेल्जियमने इस्टोनियाचा 3-1 असा पराभव करत आगेकूच केली. नेदरलँड्सला उशिरा स्वीकाराव्या लागलेल्या 2 गोलमुळे वर्ल्डकपमधील स्थान निश्चित करण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल, हे येथे स्पष्ट झाले.
बेल्जियमचा संघ घरच्या मैदानावर इस्टोनियाविरुद्ध विजयी ठरला, त्यावेळी त्यांचा खेळ फारसा प्रभावी नव्हता. पण, गुणतालिकेत दुसऱया स्थानावरील वेल्सपेक्षा त्यांच्याकडे 5 गुणांची भरभक्कम आघाडी आहे, ते सर्वाधिक महत्त्वाचे ठरले. वेल्सने कार्डिफमधील लढतीत बेलारुसचा 5-1 असा धुव्वा उडवला असून झेक प्रजासत्ताकपेक्षा ती 3 गुणांनी आघाडीवर आहेत.
मागील विश्वचषक स्पर्धेत खेळू न शकलेल्या नेदरलँड्स संघाने मॉन्टेनेग्रोवर 2-0 अशी आघाडी घेतली. मेम्फिस डेपेचे दुहेरी गोल यावेळी महत्त्वाचे ठरले होते. मात्र, नंतर मॉन्टेनेग्रोने शेवटच्या 8 मिनिटात चक्क 2 वेळा गोलजाळय़ाचा यशस्वी वेध घेत 2-2 अशी महत्त्वपूर्ण बरोबरी प्राप्त केली. या बरोबरीमुळे तुर्की व नॉर्वे यांनाही अव्वलस्थानी झेपावण्याची संधी निर्माण झाली आहे. दोन्ही संघ एक सामना बाकी असताना दोन गुणांनी पिछाडीवर आहेत.
फ्रान्सचा एकतर्फी वरचष्मा
फ्रान्सने कझाकचा 8-0 असा एकतर्फी फडशा पाडला, त्यावेळी एम्बापेचे विक्रमी 4 गोल लक्षवेधी ठरले. एकाच सामन्यात 4 गोल करणारा तो 1958 नंतरचा पहिलाच प्रेंच खेळाडू ठरला. 1958 विश्वचषक स्पर्धेत फॉन्टेनने असा पराक्रम गाजवला होता. ‘वर्ल्डकपसाठी पात्रता संपादन करणे, ही सर्वात महत्त्वाची बाब होती. एकही वर्ल्डकप न खेळलेले खेळाडू आमच्या संघात आहेत’, असे एम्बापे या सामन्यानंतर म्हणाला. सामन्यातील 32 व्या मिनिटाला एम्बापेने आपली पहिली आंतरराष्ट्रीय हॅट्ट्रिक नोंदवली होती.
या लढतीत एम्बापेने 6, 12, 32 व 87 व्या मिनिटाला गोल केले. करीम बेन्झेमाने 55 ते 59 या 4 मिनिटात दोन वेळा गोलजाळय़ाचा वेध घेतला. याशिवाय, रॅबिओटने 75 तर ऍन्टोईन ग्रिएझमनने 84 व्या मिनिटाला प्रत्येकी 1 गोल नोंदवला.
करीम बेन्झेमाने थेओ हर्नांडेझच्या समयोचित पासचा लाभ घेत पहिला गोल केला. नंतर किंग्सले कोमनने त्याला दुसरा गोल करण्यास मदत केली. एम्बापेला यापूर्वी युरो 2020 स्पर्धेत अपयश आले होते, त्याला एकही गोल करता आला नव्हता. मात्र, मागील महिन्यात त्याने फ्रान्सला नेशन्स लीग फायनल जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्या लढतीत बेन्झेमाने देखील गोल केला होता.
रविवारच्या लढतीत हर्नांडेझच्या डावीकडून दिल्या गेलेल्या पासवर बेन्झेमाने 55 व्या मिनिटाला संघाचा चौथा गोल नोंदवला. चारच मिनिटांच्या अंतराने बेन्झेमा-एम्बापे यांनी वन-टू-वन खेळ साकारत प्रतिस्पर्ध्यांवरील आघाडी आणखी भक्कम केली. बेन्झेमाचा हा दुसरा गोल ठरला. एम्बापेने यावेळी वैयक्तिक दुसरा व फ्रान्स संघातर्फे आजवरचा एकूण 35 वा गोल साकारला. ऍड्रियन रॅबिओट व ऍन्टोईन ग्रिएझमन यांनीही प्रत्येकी 1 गोल केला. नंतर एम्बापेने फोन्टेनच्या विक्रमाशी बरोबरी केली. अन्य लढतीत नॉर्वेची घसरण झाल्याने याचा तुर्कीला लाभ झाला. ते आता दुसऱया स्थानी झेपावले आहेत. आता नॉर्वेचा संघ नेदरलँड्सला रवाना होईल तर मॉन्टेनेग्रोची लढत तुर्कीविरुद्ध होणार आहे. फिफा प्ले-ऑफचा ड्रॉ दि. 26 नोव्हेंबर रोजी झुरिच येथे जाहीर करणार आहे.