70 वर्षांच्या कालावधीत घडले गैरप्रकार- याप्रकरणी 3 हजार आरोपी
वृत्तसंस्था / पॅरिस
फ्रान्सच्या कॅथोलिक चर्चमध्ये मागील 70 वर्षांपेक्षा अधिक काळात अनुमानित स्वरुपात 3 लाख 30 हजार मुलामुलींचे लैंगिक शोषण झाले आहे. एका स्वतंत्र आयोगाकडून मंगळवारी प्रसिद्ध एका अहवालात याचा खुलासा करण्यात आला आहे. अहवाल प्रसिद्ध करणाऱया आयोगाचे अध्यक्ष ज्यां मार्क सॉवे यांनी हा अुनमान वैज्ञानिक संशोधनावर आधारित असल्याचे म्हटले आहे. पाद्री तसेच चर्चशी संबंधित लोक आणि अन्य व्यक्तींकडून झालेल्या लैंगिक शोषणाची प्रकरणे यात सामील आहेत. शोषणाच्या पीडितांमध्ये 80 टक्के मुलगे होते तर उर्वरित मुली होत्या असे सॉवे यांनी म्हटले आहे.
या लैंगिक शोषणाचे परिणाम अत्यंत गंभीर आहेत. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या सुमारे 60 मुलामुलींना भविष्यात भावनात्मक तसेच अन्य गुंतागुंतींना तोंड द्यावे लागल्याचे आयोगाचे अध्यक्ष म्हणाले. याप्रकरणी 1950 पासूनच्या पीडितांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले आहे.
आयोगाने 2,500 पानांचा हा दस्तऐवज तयार केला आहे. फ्रान्स आणि अन्य देशांमध्येही कॅथोलिक चर्चमधील अशाप्रकारच्या क्रूर घटनांना दीर्घकाळापर्यंत दडपण्यात आले आहे. मुलांचे शोषण करणाऱया 3 हजार लोकांपैकी दोन-तृतीयांश जण पाद्री होते. पाद्री किंवा चर्चशी संबंधित अन्य लोकांकडून शोषण करण्यात आलेल्या मुलांची संख्या 2,16,000 असू शकते असे सॉवे यांनी म्हटले आहे.
पीडितांसाठी आवाज उठविणारी संघटना ‘पार्लर एट रेविवरे’ने (मोकळेपणाने बोला आणि पुन्हा जगा) या चौकशीत आयोगाला मदत केली आहे. शोषण करणारे आणि पीडितांचे मोठे प्रमाण विशेषकरून प्रेंच समाजासाठी, कॅथोलिक चर्चसाठी भयावह असल्याचे या संघटनेचे प्रमुख ओलिविर सॅविगनाक यांनी म्हटले आहे.
या आयोगाने दोन वर्षांपर्यंत काम करत पीडित, प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविले आणि चर्च, न्यायालय, पोलीस तसेच 1950 च्या दशकात प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रकरणांचे अध्ययन केले. चौकशीच्या प्रारंभी एक विशेष हेल्पलाईन देखील सुरू करण्यात आली. यावर पीडित किंवा त्याच्याबद्दल माहिती दिली जाऊ शकत होती. आयोगाला यादरम्यान 6,500 हून अधिक लोकांनी फोनवर माहिती दिली आहे.
सॉवे यांनी शोषणाच्या या प्रकरणांवरून चर्चच्या पूर्वीच्या भूमिकेवर टीका करत पीडितांबद्दल भेदभाव करण्यात आला आणि घटनेसाठी त्यांनाच संशयाच्या नजरेतून पाहिले गेल्याचे म्हटले आहे.