वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्सच्या फुटबॉल संघातील अव्वल दर्जाचा फुटबॉलपटू पॉल पोग्बाला दुखापत झाल्याने तो फिफाच्या आगामी विश्वकरंडक पात्र फेरीच्या फुटबॉल सामन्यात खेळू शकणार नाही, अशी माहिती फ्रान्सच्या फुटबॉल फेडरेशनने दिली आहे.
2022 साली कतारमध्ये होणाऱया फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत सहभागासाठी पात्र फेरीच्या स्पर्धा सध्या विविध ठिकाणी खेळविल्या जात आहेत. फ्रान्सचे पात्र फेरीतील सामने कझाकस्तान आणि फिनलँडविरुद्ध होणार आहेत. फ्रान्स संघातील फुटबॉलपटू पोग्बाच्या उजव्या पायाच्या मांडीला दुखापत झाली असून ती सध्या पूर्णपणे बरी झालेली नाही. या दुखापतीमुळे पोग्बाला पात्र फेरीतील आगामी दोन सामन्यांना मुकावे लागणार आहे.
पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेत फ्रान्सचा संघ ड गटातून सहा सामन्यात 12 गुणांसह आघाडीवर आहे. फ्रान्स संघातील आणखी एक महत्त्वाचा खेळाडू राफेल व्हेरेनी याला स्नायु दुखापतीमुळे आणखी काही आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे.