ऑनलाईन टीम / पॅरिस :
फ्रान्सने देशातील नागरिकांसाठी कोरोना चाचणी मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्या नागरिकांनी यापूर्वी खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी केली असेल, त्यांनाही रिफंड देण्यात येणार असल्याची घोषणा फ्रान्सचे आरोग्यमंत्री ऑलिव्हियर वेरन यांनी केली आहे.
फ्रान्समध्ये कोणताही नागरिक पीसीआर कोरोना चाचणी पुन्हा करू शकतो. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याची अथवा चिठ्ठीची गरज नसेल. लक्षणे नसलेले नागरिकही मोफत कोरोना चाचणी करून घेऊ शकतात. फ्रान्समध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन वेरन यांनी केले आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत फ्रान्सचा जगात 19 वा क्रमांक लागतो. फ्रान्समध्ये आतापर्यंत 1 लाख 80 हजार 528 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 80 हजार 815 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 69 हजार 527 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामधील 410 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर आतापर्यंत 30 हजार 192 रुग्ण दगावले आहेत.