ऑनलाईन टीम / पॅरिस :
फ्रान्समध्ये कोरोनाची तिसरी लाट आली असून, नोव्हेंबरनंतर प्रथमच सात दिवसांत नवीन बधितांचा आकडा 25 हजारांवर गेला आहे. फ्रान्सचे पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांनी संसदेत यासंदर्भात माहिती दिली.
फ्रान्समध्ये कोरोनाचे नवे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. यामुळे रुग्णालयांवर प्रचंड ताण पडत आहे. त्यातच सोमवारी फ्रान्सच्या लानियन येथील एका रुग्णालयात कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. कोरोनाच्या इतर स्ट्रेनपेक्षा हा काहीसा वेगळा असल्याचे प्राथमिक विश्लेषणातून समोर आले असले तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे फ्रान्सच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले होते.
दरम्यान, लसीकरण्याच्या बाबतीत फ्रान्स अमेरिका आणि ब्रिटनच्या खूपच मागे आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना अजूनही आशा आहे की, लसीकरणामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे दुष्परिणाम आणि तिसरा लॉकडाऊन टाळता येईल. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते कोरोनाच्या रुग्णांमध्ये झालेली वाढ केवळ लॉकडाऊन करूनच टाळता येऊ शकते.