इस्लामिक दहशतवादविरोधी लढाई सुरूच राहणार
वृत्तसंस्था / पॅरिस
पॅरिसच्या कम्युटर टाऊन येथील एका पोलीस स्थानकाबाहेर दहशतवाद्यांकडून महिला पोलीस कर्मचाऱयाची हत्या करण्यात आल्यावर आता फ्रान्स सरकारने एंटी टेररिझम इन्व्हेस्टिगेशनचे आदेश दिले आहेत. या घटनेवर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आमच्या इस्लामिक दहशतवादविरोधी लढाईतून मागे हटणार नाही. पूर्ण देश स्टेफनी यांचे कुटुंब, सह-कर्मचारी आणि सुरक्षा दलांसोबत असल्याचे मॅक्रॉन यांनी सोशल मीडियावर शपथ घेत म्हटले आहे.
शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास येथील एका महिला पोलीस अधिकाऱयाची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. याच्या काही वेळातच दहशतवादविरोधी पथकाने दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते. तसेच तीन जणांना अटक केली होती. तर फ्रान्सच्या नॅशनल अँटी टेररिझम प्रॉसिक्युटरने ही एक खुली चौकशी असून यात डोमेस्टिक इंटेलिजेन्स सर्व्हिसही (डीजीएसआय) मदत करत असल्याचे सांगितले आहे.
पोलीस स्थानकाच्या प्रवेशद्वारानजीक ही हत्या झाली आहे. विशेष म्हणजे हा सर्वात सुरक्षित भाग मानला जातो. 49 वर्षीय महिला पोलीस अधिकाऱयाचे नाव स्टेफनी आहे. त्या प्रशासकीय सहाय्यिका होत्या. त्यांना दोन मुलेही आहे. लंच बेकवरून त्या कामावर परतत असताना त्यांच्या मानेवर एका दहशतवाद्याने चाकूने दोन वार करत हत्या केली होती.
दोन वर्षात पाचव्यांदा घटना
पॅरिसमध्ये मागील दोन वर्षामध्ये पाचव्यांदा अशाप्रकारचा हल्ला झाला आहे. तर दुसऱयांदा एखाद्या पोलीस अधिकाऱयाला लक्ष्य करण्यात आले आहे. पंतप्रधान जीन कास्टेक्स यांनी याला थेटपणे दहशतवादी हल्ला ठरविले आहे. अशाप्रकारच्या घटनांमुळे आम्ही हार मानणार नाही. आम्ही अत्यंत कठोरपणे या लोकांना सामोरे जाण्यास तयार आहोत असे कास्टेक्स यांनी म्हटले आहे.
हत्येपूर्वी नारे
हे अत्यंत घृणास्पद कृत्य आहे. या कामात सामील लोकांना आम्ही धडा शिकवणार आहोत. हल्लेखोराने अधिकाऱयाच्या हत्येपूर्वी नारेही दिले होते अशी माहिती एंटी टेरर प्रॉसिक्युटर जीन प्रेंकोइस यांनी दिली आहे.