प्रदीपसिंग खरोला यांची सांबरा विमानतळाला भेट
बेळगाव / प्रतिनिधी
केंद्रीय विमान वाहतूक विभागाचे सचिव प्रदीपसिंग खरोला यांनी नुकतीच बेळगाव विमानतळाला भेट दिली. विमानतळावर होऊ घातलेल्या फ्लाईंग स्कूलमुळे बेळगावचे नाव देशभरात होईल. नविन मुलांना विमान प्रशिक्षण घेणे सोयीचे ठरेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
25 वर्षांपूर्वी प्रदीपसिंग खरोला हे बेळगावमध्ये जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. यावेळी त्यांनी बेळगावमधील आठवणींना उजाळा दिला. विमानतळाकडे खुल्या असणाऱया जागेचा फ्लाईंग स्कूलसाठी केलेला उपयोग अत्यंत स्वागतार्ह असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच त्यांनी खुल्या जागेची पाहणीही केली. पूर्वी एक ते दोन विमाने येणाऱया सांबरा विमानतळावर आता दररोज 20 विमाने येत असल्याने हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. विमानतळ संचालक राजेशकुमार मौर्य यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विमानतळाचे इतर कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.