सेंट जॉन्स (अँटिग्वा) / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी वेळेत पथकात दाखल न होणाऱया शिमरॉन हेतमेयरला विंडीजने टी-20 वर्ल्डकप संघातून डच्चू दिला. हेतमेयर शनिवारी गयानातून रवाना होणे अपेक्षित होते. मात्र, कौटुंबिक कारणास्तव त्याने सोमवारपर्यंत वेळ मागितला. पण, नंतर सोमवारी देखील आपण रवाना होऊ शकत नसल्याचे कळवल्यानंतर विंडीजने त्याला टी-20 वर्ल्डकप संघातून डच्चू दिला आणि त्याच्याऐवजी शमरह ब्रूक्सला तातडीने पाचारण केले. ब्रूक्सने मागील डिसेंबरमध्ये टी-20 पदार्पण केले असून 11 सामन्यातील त्याची सरासरी 23 इतकी आहे.
‘शिमरॉनने शनिवारऐवजी सोमवारी संघात दाखल होण्याची परवानगी मागितली, त्याचवेळी आम्ही त्याला आणखी उशीर होणार असेल तर दुसरा खेळाडू निवडावा लागेल, याची कल्पना दिली होती. टी-20 वर्ल्डकप स्पर्धा विशेष महत्त्वाची असल्याने संघाच्या तयारीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्या अनुषंगाने हा निर्णय घ्यावा लागला’, असे विंडीज क्रिकेट संचालक जिम्मी ऍडम्स यांनी नमूद केले.