ऑनलाईन शॉपिंगकडे वाढतोय कल – आणखी 20 शहरात विस्ताराचे संकेत
नवी दिल्ली
मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे प्रभावीत झालेले व्यवसाय आता सावरत असल्याचे पहावयास मिळत आहे. ऑनलाईन ग्रॉसरी व्यवसायाला लॉकडाऊनपासून मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद लाभतो आहे. याचाच परिणाम म्हणून वॉलमार्टच्या मालकीच्या ई कॉमर्स क्षेत्रातील फ्लिपकार्टने सहा महिन्यांमध्ये आपला ग्रॉसरी व्यवसाय हा आणखी 20 शहरांमध्ये विस्तारीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
फ्लिपकार्टने ग्रॉसरी व्यवसायाच्या विस्ताराची योजना आखली आहे. यामध्ये अगोदरपासून देशातील 50 शहरांमध्ये ग्रॉसरीची विक्री केली जात आहे आणि टाटा समूहाचा मार्केट लिडर बिग बास्केटचीही खरेदी करण्याचे संकेत आहेत.
सदर ऑनलाईन ग्रॉसरी स्टार्टअपमध्ये टाटा समूह 9100-9200 कोटी रुपयामध्ये 68 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याची शक्यता आहे. फ्लिकार्टमध्ये ग्रॉसरी, जनरल मर्चंडाइज आणि फर्निचर सेगमेंटसाठीची वर्गवारी तयार केली असल्याचे स्पष्टीकरण वरीष्ठ उपाध्यक्ष मनीष कुमार यांनी सांगितले आहे.
टीयर-2 शहरात तेजी
मागच्या वर्षी ग्रॉसरीची मागणी अतिशय वेगाने वाढली होती. कारण लॉकडाऊनच्या कारणास्तव सर्वच दुकाने, व्यवसाय बंद राहिल्याने टीयर-2 शहरांमध्ये ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणात घरात बसून ऑनलाइन शॉपिंग करण्यावर भर दिला असल्याचीही माहिती कुमार यांनी दिली आहे.
हायपर लोकल डिलीव्हरी
उत्पादनामध्ये दररोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तू, स्नॅक्स आणि घरात वापर होणाऱया साहित्याचा समावेश राहिला आहे. यांच्या त्वरीत वितरणासाठी फ्लिपकार्टने बेंगळूरमध्ये हायपर लोकल डिलीव्हरी मॉडेल ‘फ्लिपकार्ट क्विक’ सेवा सुरू केलीय. याअंतर्गत ऑर्डर केल्यापश्चात ग्राहकाला 90 मिनिटात मागवलेल्या वस्तुंची डिलीव्हरी मिळणार असल्याची माहिती आहे.