150 सातारकरांचा सहभाग, गांधी मैदान येथून प्रारंभ
प्रतिनिधी/ सातारा
जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने सातारा नगरपालिका अािण इनरव्हील क्लब ऑफ सातारा कॅम्प, हिरकणी फौंडेशन यांच्यासह विविध संस्थांच्या सहकार्याने फ्लॉगथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तब्बल 150 सातारकरांनी सहभाग नोंदवत 80 किलो प्लास्टिक गोळा केले. या स्पर्धेची सुरुवात गांधी मैदान येथून सकाळी झाली. तीन किलोमीटर आणि पाच किलोमीटर अंतरापर्यंतचे प्लास्टिक संकलित करण्यात आले. संकलित करण्यात आलेल्या प्लास्टिक पुनर्वापरासाठी देण्यात आले. दरम्यान, सहभागी झालेल्या सर्व सातारकरांना प्रमाणपत्र, मेडल देऊन गौरवण्यात आले.
जागतिकीकरणाच्या स्पर्धेत प्लास्टिकचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होत असून त्याचे नष्ट होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे कचऱयात प्लास्टिक तशाच अवस्थेत पडून राहते. प्लास्टिकचा वापर पुन्हा करता येतो. प्लास्टिक कचऱयात टाकू नये, प्लास्टिक कचऱयातून बाजूला ठेवावे, असे प्रबोधन करण्यासाठी सातारा शहरात सातारा नगरपालिका, इनरव्हील क्लब ऑफ सातारा कॅम्प, साथ सामाजिक संस्था, रानवाटा ग्रुप, स्वच्छंदी ग्रुप, इस्लामपूर प्लोगर ग्रुप, डी. जी. कॉलेज, केबिपी कॉलेज, यशवंतराव चव्हाण सोशल कॉलेज, 7 हील रोट्राक क्लब, हिरकणी फाउंडेशन, कूपर कॉर्पोरेशन टीम, इंडिया पोस्ट, पोदार इंटरनॅशनल स्कूल, धर्मवीर युवा मंच, बँकर ग्रुप, राधिका पॅलेस, कुल गोळा, उदयनराजे मित्र समूह आदींच्या सहभागाने प्लॉगथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी गांधी मैदानापासून प्रारंभ झाला. स्पर्धेतील सहभागी झालेल्या सातारकरांनी प्लास्टिक गोळा करुन ते एकत्रितपणे पूनर्वापरासाठी देण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी इनरव्हील क्लब ऑफ सातारा कॅम्प प्रेसिडेंट अनिता नागोरी, सचिव मृणाल जोशी, प्रोजेक्ट हेड जयश्री शेलार, मिनाज मुलाणी, माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन गीता मामणीया यांनी विशेष परिश्रम घेतले. सातारा नगर परिषद मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामधील आरोग्य निरीक्षक सागर बडेकर, प्रशांत गंजीवाले, गणेश टोपे, प्रवीण यादव सहभागी होते.