अमेरिकेतील गाजलेले प्रकरण – दोन महिन्यात शिक्षेची घोषणा – 40 वर्षांपर्यंतची कैद शक्य
वृत्तसंस्था / ह्यूस्टन
अमेरिकेत मागील वर्षी झालेल्या कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयडच्या हत्येप्रकरणी पोलीस अधिकारी डेरेक चॉविनला दोषी ठरविण्यात आले आहे. त्याच्या शिक्षेची घोषणा पुढील दोन महिन्यांमध्ये केली जाणार आहे. चॉविनला कमाल 40 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो असे मानले जात आहे. 46 वर्षीय फ्लॉयडच्या मानेवर 9 मिनिटे 29 सेकंदांपर्यंत स्वतःचा गुडघा दाबून धरल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप चॉविनवर आहे.
6 श्वेतवर्णीय आणि 6 कृष्णवर्णीय तसेच एक मल्टीरेशियल न्यायाधीशांच्या ज्युरींनी सुमारे 10 तासांच्या सुनावणीनंतर स्वतःचा निर्णय दिला आहे. चॉविन सर्व प्रकरणांमध्ये दोषी आढळला आहे. न्यायालयाकडून निर्णय देण्यात आल्यानंतर चॉविनचा जामीनही रद्द झाला आहे. चॉविनला हातात बेडय़ा ठोकून पुन्हा तुरुंगात पाठविण्यात आले आहे. आज आम्ही पुन्हा एकदा श्वास घेऊ शकत आहोत असे उद्गार फ्लॉयड यांचे कनिष्ठ बंधू फिलोनाइस यांनी निर्णयानंतर काढले आहेत. जॉर्ज फ्लॉयड याच्यावर ह्यूस्टनमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
मिनेपोलिसमध्ये मागील वर्षी 25 मे रोजी फ्लॉयडला पोलिसांनी फसवणुकीप्रकरणी अटक केली होती. तत्पूर्वी पोलीस अधिकारी डेरेक चॉविनने फ्लॉयडला रस्त्यावर पाडून स्वतःच्या गुडघ्याद्वारे त्याची मान सुमारे 8 मिनिटांपर्यंत दाबून ठेवली होती. फ्लॉयडच्या हातात बेडय़ा होत्या. 46 वर्षीय जॉर्ज सातत्याने पोलीस अधिकाऱयाला गुडघा हटविण्याची विनवणी करत राहिल्याचे चित्रफितीत दिसून आले हेते.