वार्ताहर / कुदनूर
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्यासह सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, कुदनूर येथे सोमवारी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले. स्थानिक प्रशासनाकडून गर्दी नियंत्रणात आणण्यासह सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात येत होत्या मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
कुदनूर येथे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि यूनियन बँकेची शाखा आहे. या बँकांमध्ये कुदनूरसह कालकुंद्री, किटवाड, खन्नेटी, दुंडगे, तळगुळी, दिंडलकोप आणि राजगोळी आदी गावातील नागरिकांचे आर्थिक व्यवहार होत असतात. तीन दिवसाच्या सुट्टीनंतर बँका सुरू झाल्यामुळे कुदनूरसह परिसरातील ग्राहकांनी बँकांसमोर एकच गर्दी केली होती. परिणामी सोशल डिस्टन्सिंगला हारताळ फासत ग्राहक बँकांच्यासमोर दाटीवाटी करत होते. यामुळे बँक कर्मचार्यांसह स्थानिक प्रशासनाला ग्राहकांच्या अरेराविला सामोरे जावे लागले.
५०० रुपयासाठी जीव धोक्यात
केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खातेधारकाच्या खात्यात ५०० रुपये तर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत २००० रुपये जमा करण्यात आले आहेत. या पैशांसाठी जीव धोक्यात घालून वयोवृद्ध महिला तसेच पुरुष मंडळी बँकांसमोर दाटीवाटी करत असल्याचे चित्र कुदनूर येथे पहावयास मिळत होते. यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गाची कसलीच भीती येथील नागरिकांत नसल्याचे चित्र होते.