जावली तालुक्यातील घटना- दोघे जिल्हा रुग्णालयात
प्रतिनिधी/ सातारा
मेढा येथील ज्ञानदीप बँकेकडून घेतलेले कर्ज फिटले नाही. अखेर बँकेने वसुली प्रक्रिया सुरु केली होती आणि कर्जापोटी मंगळवार दि. 2 रोजी घरावर जप्तीची कारवाई होणार होती. याच तणावातून नेवेकरवाडी, ता. जावली येथील पती, पत्नीने विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली. या दोघांना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे.
याबाबत रुग्णालयीन पोलीस चौकीतून मिळालेली माहिती अशी, भास्कर तानाजी गायकवाड (वय 42) व सुरेखा भास्कर गायकवाड (वय 40, दोघेही रा. नेवेकरवाडी, ता. जावली) यांनी पाच वर्षांपूर्वी मेढा येथील ज्ञानदीप बँकेकडून 5 लाख रुपये कर्ज घेतले होते. या कर्जातून त्यांनी हॉटेल व्यवसाय सुरु केला होता. मात्र, काही कारणाने त्यांच्याकडून कर्जफेड होवू शकली नव्हती.
त्यामुळे ज्ञानदीप बँकेने त्यांच्याविरुध्द वसुलीची प्रक्रिया सुरु केली होती. त्यातूनच मंगळवारी या कर्जापोटी तारण ठेवलेल्या मालमत्तेची जप्ती प्रक्रिया होणार होती. त्या तणावातून मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भास्कर गायकवाड व सुरेखा गायकवाड यांनी विषारी औषध प्राशन केले. ही घटना निदर्शनास आल्यावर नातेवाईकांनी दोघांनाही तातडीने सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती सध्या तरी स्थिर आहे.