बेंगळुरातील घटना : ग्राहकाची पोलिसात तक्रार
प्रतिनिधी/ बेंगळूर
बँक ऑफ बडोदाच्या लॉकरमध्ये ठेवलेले 85 लाख किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना बेंगळुरात उघडकीस आली आहे. याबाबत जयनगर पोलीस स्थानकात शिवप्रसाद (वय 52) नामक व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी, शिवप्रसाद यांनी आपल्या बँक लॉकरमध्ये फेब्रुवारी महिन्यात 1.73 किलो सोन्याचे दागिने ठेवले होते. देशात कोरोनामुळे लॉकडाऊन जारी करण्यात आल्याने 22 फेबुवारी ते 21 जुलैपर्यंत ते बँकेकडे गेले नव्हते. दरम्यान, 22 जुलै रोजी बँकेतील लॉकर उघडले असता 50 ग्रॅमची सोनसाखळी, 45 ग्रॅमचे दागिने, 1200 ग्रॅम सोन्यासह एकूण 1.73 किलोचे दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. यानंतर त्यांनी याबाबत जयनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून डीसीपी डॉ. रोहिनी कटोच यांनी तपास हाती घेतला आहे.