प्रतिनिधी/ ओरोस
सारस्वत बँकेच्या वैभववाडी आणि कणकवली येथील शाखेत सुमारे साडे तीन कोटी रुपये रकमेची अफरातफर केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रल्हाद मनोहर मांजरेकर याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश 2 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी फेटाळून लावला आहे. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता संदीप राणे यांनी काम पाहिले. तर बँकेच्यावतीने वकील स्वरुप पई यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.
सारस्वत बँकेच्या वैभववाडी आणि कणकवली शाखेत सुमारे साडे तीन कोटी रुपयांची अफरातफर झाली होती. या प्रकरणी बँकेने दिलेल्या तक्रारीवरून प्रल्हाद मांजरेकर, कल्पेश महाडिक आणि सौमित्र प्रभू या तीन संशयितांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. यातील सौमित्र प्रभू हा मयत आहे.
प्रल्हाद मांजरेकर व कल्पेश महाडिक हे सारस्वत बँकेचे कर्मचारी आहेत. त्यांनी 28 खातेदारांची वैभववाडी व कणकवली येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे ओव्हर ड्राफ्ट कर्जखाती तयार केली. त्या आधारे 3 कोटी 51 लाख 37 हजार रुपयांची अफरातफर केल्याची तक्रार सारस्वत बँकेने पोलिसांत दिली होती. त्यानुसार या संशयितावर भा. दं. वि. 406, 409, 418, 420, 465, 467, 468, 471, 477 (अ) 201, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी प्रल्हाद मांजरेकर याला 9 जुलै रोजी अटक झाली होती. 10 रोजी कणकवली न्यायालयाने त्याला 17 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. फिर्यादी बँकेने या जामीन अर्जाला हरकत घेतली होती. तर मांजरेकर याने पोलीस तपासात अफरातफर झालेल्या काही खात्यांचे बनावट ओव्हर ड्राफ्टचे कागदपत्र आपल्या हस्ताक्षरातील असल्याची कबुली दिली असल्याची बाब न्यायालयासमोर आणत जामीन नाकारण्याची विनंती केली होती.