बिहारमध्ये घडला प्रकार : शाखेत उडाली खळबळ
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारची राजधानी पाटणा येथील एका बँकेतून पैसे काढण्यासाठी एक मृतदेहच पोहोचल्याने अधिकाऱयांमध्ये खळबळ उडाली आहे. पाटण्यातील सिगरियावां गावानजीक कॅनरा बँकेत तिरडीवरील व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी लोक पोहोचल्यावर खळबळ उडाली आहे. 55 वर्षीय महेश यादव यांचा मंगळवारी 5 जानेवारी रोजी मृत्यू झाला होता.
महेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीयांकडे पैसे नव्हते. अशा स्थितीत ग्रामस्थ बँकेत पोहोचले आणि त्यांनी महेश यांच्या खात्यात जमा रक्कम देण्याची मागणी केली होती. परंतु बँकेच्या बँकेच्या अधिकाऱयांसमोर नियम-कायद्याचा पेच निर्माण झाला होता. रक्कम न मिळाल्याने ग्रामस्थांनी मृतदेहासह बँकेत धाव घेतली. या प्रकारानंतर बँक शाखेतच खळबळ उडाली. सुमारे 5 तासांपर्यंत महेश यांचा मृतदेह बँकेत होता. अखेरीस बँक व्यवस्थापकांनी स्वतःच्या वतीने 10 हजार रुपये देत ग्रामस्थांची समजून काढून अंत्यसंस्कारासाठी पाठविले.
मृत महेश यादव यांचा विवाह झाला नव्हता. याचमुळे त्यांनी बँक खाते सुरू करताना कुठल्याच वारसाचे नाव दिले नव्हते. त्यांच्या खात्यात एक लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा होती.