प्रतिनिधी/ सातारा
कोणाही अनोळखी वा कोणाचाही फोन आला तरी त्याला बँक अकाऊंट, पिन, ओटीपी वा कोणतीच माहिती देवू नका, असे आवाहन वारंवार केले तरी लोकांना अद्याप समज येत नाही. कोरेगावातील एकाला असाच अनुभव आला असून त्याने अनोळखीला फोनवर बँकेच्या अकाऊंटची माहिती घेऊन नेट बँकींगचा वापर करत एकाला एक लाख 89 हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना कोरेगावात घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार हरी गोविंद रामप्रसाद चौरासिया (वय 32, मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. सुभाषनगर, कोरेगाव) या युवकाला दि. 13 रोजी 8617613268 या मोबाईल क्रमांकावरुन त्याच्या मोबाईलवर फोन आला. त्यावेळी तो फरशी बसवण्याचे काम करत होता. अनोळखी व्यक्तीने त्याला एसबीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगत तुमचे स्टेट बँकेचे खाते बंद होणार असे खोटे सांगितले. त्याच्याकडून बँकेचा अकाऊंट क्रमाकांसह इतर माहिती घेतली.
यानंतर चौरासिया ही गोष्ट विसरुन कामात व्यस्त झाले. पण त्यांना बँकेच्या अकाऊंटवरुन तब्बल 1 लाख 89 हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. वास्तवात चौरासिया यांनी कोणतीची रक्कम काढली नसताना मेसेज आल्याने बँकेशी संपर्क साधला. तेव्हा त्यांच्या खात्यावरुन इंटरनेट बँकिंगद्वारे ही रक्कम विड्रॉल झाली असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी ही फसवणूक समोर आली. चौरासिया यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन 8617613268 या मोबाईलवरुन फोन करुन फसवणूक केलेल्या अनोळखीविरुध्द फसवणुकीची तक्रार दिली आहे.
झटक्यात बँकेचे अकाऊंट खाली झाल्याने चौरासिया यांना सध्या तरी कपाळावर हात मारुन घेण्याशिवाय कोणताच पर्याय नाही. पोलिसांनी अनोळखीवर गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला असून या गुन्हय़ाचा पुढील तपास कोरेगावचे उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे करत आहेत.