वार्ताहर/ शिरवळ
शिरवळ (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत एका फर्निचर शोरूमसमोर एका राष्ट्रीयकृत बँकेतील मंगेश कुदळे (सध्या रा. पिंपरी चिंववड) या उपव्यवस्थापकाला रात्रीच्या वेळेस मोटार सायकलवर येऊन तिघांनी अडवून चाकुने हल्ला करत जबर मारहाण केली. तसेच रोख रकमेसह आठ हजाराचा मोबाईल घेऊन फरार झाले. शिरवळ पोलिसांनी 24 तासात या गुन्हय़ातील तिघांना अटक केली आहे.
शिरवळ पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेल्या एका राष्ट्रीयकृत बँकेतील उपव्यवस्थापक मंगेश कुदळे हे शुक्रवारी रात्री 9.45 वाजता शिरवळ येथे उतरून नायगाव या ठिकाणी जाण्यासाठी 11.45 वाजता वाहन न मिळाल्याने सर्व्हिस रोडने पंढरपूर फाटय़ाच्या दिशेने पायी चालत निघाले होते. जात असताना एका फर्निचर शोरूम समोर पाठीमागून ऍक्टिवा दुचाकी क्रमांक एम एच 11 बी .यु.9308 वरून तिघांनी येऊन कुदळे यांना अडवून संबंधितांनी शिवीगाळ, दमदाटी केली. खिशामधील चाकू काढून त्यांच्याव हल्ला करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच 2 हजार रुपये रोख व 8 हजार रुपये किमतीचा मोबाईल लुटून नेत शिरवळ गावच्या दिशेने पोबारा केला होता. याबाबतची फिर्याद बँक उपव्यवस्थापक मंगेश कुदळे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली आहे.
या गुह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे, शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांनी तत्काळ गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहा. पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक सतीश आदेंलवार यांच्या पथकाने गुन्हा घडल्यानंतर 24 तासाच्या आत तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे गुह्यातील आरोपी अतिश उर्फ बाबू राजेंद्र कांबळे (वय- 21 रा. बौद्ध आळी शिरवळ ता. खंडाळा), सोमनाथ जयसिंग भोसले (वय-21 रा.जवळे ता.खंडाळा), धनंजय उर्फ दादया शिवाजी माने (वय-19 रा. तानाजी चौक शिरवळ ता.खंडाळा) यांना मोठय़ा शिताफीने अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ हे करीत आहेत.