लोकांच्या तक्रारींचा वाचला पाढा : हिंदी भाषिक व्यवस्थापकांना दिली मराठीची पुस्तके
वार्ताहर / कुडाळ:
बँक ऑफ इंडिया माणगाव शाखेतील व्यवस्थापनाबाबत लोकांच्या असलेल्या तक्रारींचा पाढा मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी वाचून जाब विचारला.
लोकांशी सौजन्याने वागा. अन्यथा गंभीर दखल घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या शाखेच्या हिंदी भाषिक व्यवस्थापकांना मराठीचे धडे धेण्यासाठी मराठी अक्षरांची ओळख आणि उजळणी पुस्तकाची भेट दिली.
माणगाव पंचक्रोशीतील माणगाव बाजार येथे असलेल्या बँक ऑफ इंडिया शाखेच्या व्यवस्थापनाबाबत पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी धीरज परब यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. याबाबत परब यांनी थेट त्या बँकेत जाऊन जाब विचारला.
बँकेचे व्यवहार मराठीतच व्हावेत
मनसेचे सागर सावंत, सुशांत परब, प्रथमेश धुरी, सिद्धेश परब, शेखर गायचोर उपस्थित होते. हिंदी भाषिक व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी ग्रामीण भागातील लोकांशी सौजन्याने वागत नाहीत. कर्ज प्रकरणे, शासकीय लाभाच्या योजना राबविताना होणारा विलंब, बचतगटाच्या संबंधित कागदपत्रे अशा अनेक तक्रारींबाबत जाब विचारत बँकेचे व्यवहार मराठीतच व्हावेत, अशी मागणी केली.
परत तक्रारी आल्यास गंभीर दखल
याबाबत कर्मचाऱयांची बैठक घेऊन या सुधारणा तात्काळ कराव्यात. जनतेशी सौजन्याने वागावे. परत अशा तक्रारी आल्यास त्याची गंभीर दखल घेऊ. तुम्ही लोकांशी उद्धट भाषा वापरू नका, असा सल्ला परब यांनी शाखा व्यवस्थापक गौरव राज यांना दिला.
मराठी भाषा येत नसेल, तर शिका!
बँक व्यवहार मराठीत करा. अशिक्षित लोकही या बँकेत येतात. त्यांना हिंदी भाषा समजत नाही व बोलताही येत नाही. तुम्ही त्यांना सेवा देण्यासाठी आहात. त्यांच्याशी तुम्ही मराठीतूनच बोलले पाहिजे. मराठी भाषा येत नसेल, तर ती शिका, असे सांगून मराठी शिकण्याकरिता ‘मराठी अक्षरे ओळख आणि उजळणी पुस्तके’ शाखा व्यवस्थापक गौरव राज यांना भेट दिली.