दोडामार्ग/ वार्ताहर-
बँक ऑफ महाराष्ट्रमधील हंगामी सफाई कामगारांचे होणारे कंत्राटिकरण व अन्याय थांबवून तात्काळ बँक सेवेत कायम करावे. अन्यथा 26 जानेवारीला आत्मदहन करण्याचा इशारा दोडामार्ग पासून महाराष्ट्रातील विविध कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत व्यक्त केला. सामाजिक कार्यकर्ते संजय नाईक यांच्या नेतृवाखाली हा इशारा देण्यात आला असून जर कोविड निर्बंध असल्यास कोणत्याही शहरात हा उद्रेक होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत महाराष्ट्रामधील विविध शाखांमध्ये जे हंगामी सफाई कर्मचारी अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचे सेवायोजन कार्यालय या विभागातर्फे लेखी ऑर्डर देऊन त्यांना कामाच्या ठिकाणी हजर होण्याबाबत आदेश देण्यात आलेले होते. सदर आदेश मिळाल्यानंतर आपल्या बँकेच्या विविध शाखांमध्ये हंगामी सफाई कर्मचारी म्हणून आजअखेर प्रामाणिकपणे काम करत आहेत. सदर ऑर्डर मिळाल्यापासून अनेक हंगामी सफाई कर्मचारी नोकरीसाठी प्रयत्न न करता काम करत राहिले आहेत. सध्या अनेक कर्मचाऱ्यांचे वय नियमाच्या बाहेर गेले असून बँकेकडून त्यांना आजअखेर नोकरीत कायम केलेले नाही.