नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बँक कर्मचाऱयांच्या कुटुंबियांना दिलासा देताना केंद्र सरकारने त्यांच्या फॅमिली पेन्शनमध्ये वाढ केली आहे. तसेच या पेन्शनचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. यापुढे ही पेन्शन निवृत्त कर्मचाऱयाच्या शेवटच्या वेतनाच्या 30 टक्के इतकी करण्यग्नात आली असून त्यामुळे रक्कम 30,000 ते 35,000 इतकी होईल. आधीच्या नियमानुसार ती 9,284 रुपये इतकीच किमान होती.
पेन्शनच्या प्रमाणात वाढ करावी अशी मागणी भारतीय बॅक संघटनेने (आयबीए) केली होती. यापूर्वी पेन्शन शेवटच्या वेतनाच्या 15 टक्के, 20 टक्के आणि 30 टक्के अशी तीन स्तरांमध्ये होती. कर्मचाऱयाच्या स्थानाप्रमाणे या स्तरांची विभागणी करण्यात येत होती. तथापि ही पद्धती बदलून एकच 30 टक्क्यांचा स्तर ठेवावा, अशी मागणी अनेक कर्मचारी संघटनांनीही केली होती. केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली. यामुळे लक्षावधी कर्मचाऱयांना दिलासा मिळाला.
एम्प्लॉयर योगदान वाढविणार
कर्मचाऱयांच्या पेन्शननिधीतील ऍम्प्लॉयरचे योगदानही वाढविण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. सध्या हे योगदान 10 टक्के इतके आहे. ते वाढवून 14 टक्के करण्यात यावे, अशी सूचना केंद्राने केली आहे. सर्व सार्वजनिक बँका लवकरच ही सूचना लागू करतील अशी शक्यता आहे. या महिन्याच्या प्रारंभी बँक कर्मचाऱयांचा महागाई भत्ताही (डियरनेस अलाऊन्स) वाढविण्यात आला होता.