प्रतिनिधी/ सातारा
बँक संघटनांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात दोन दिवसीय संप पुकारला आहे. हा संप दि. 15 आणि 16 मार्च रोजी होणार असुन, या संपामुळे बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. दि. 15 व 16 रोजी सोमवार, मंगळवार असुन दि. 14 मार्च रोजी रविवार दि. 13 मार्च रोजी दुसरा शनिवार असल्यामुळे या बँका बंद राहणार आहेत.
सन् 2021 च्या अर्थसंकल्पात सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे व एक विमा कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देशात 12 सरकारी बँका आहेत. त्यानंतर त्यांची संख्या 10 वर जाईल. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये दोन बँकांचे खासगीकरण केले जाणार आहे. त्या विरोधातच हा बंद पुकारला आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन तर्फे हा संप पुकारला आहे. सध्या बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या चार बँकांचा खासगीकरणाचा विषय केंद्रसरकारच्या अजेंडय़ावर आहे. या चार बँकापैकी दोन बँकांचे खासगीकरण हे 2021-22 या आर्थिक वर्षात केलं जाण्याची शक्यता आहे.
या सर्व प्रकारामुळे संबंधीत बँक कर्मचाऱयांच्या नोकरीवर देखिल गदा येण्याची शक्यता आहे. सध्या देशात बेरोजगारी वाढली आहे, त्यातच या कर्मचाऱयांची कपात करण्यात येणार असल्याने, या कर्मचाऱयांवर सध्या आसमानी संकट कोसळले आहे. तसेच बँकांचे खासगीकरण झाल्यास नागरिकांची संबंधीत बँकेबाबत विश्वासार्हता कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा बंद पुकारला असल्याचे सांगण्यात येत आहे. या संपाबाबतची महत्वाची बैठक दि. 10 रोजी होणार असुन त्यानंतर पुढील रूपरेषा ठरणार आहे.