छुप्या कॅमेऱयाद्वारे पासवर्डची चोरीचा संशय, दहा जणांना फटका
प्रतिनिधी \ बेळगाव
रविवारी दिवसभरात बेळगाव शहर व उपनगरातील दहाहून अधिक ग्राहकांच्या बँक खात्यातील रक्कम भामटय़ांच्या एका टोळीने गायब केली आहे. यासंबंधी सोमवारी सीईएन विभागात तक्रार करण्यात आली असून एटीएममध्ये छुपा कॅमेरा ठेवून पासवर्ड चोरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
नेहमी ‘तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. नव्या कार्डसाठी जुन्या कार्डचा पासवर्ड द्या’ अशी बतावणी करून बँक खात्यातील रक्कम हडप करण्यात येत होती. आता भामटय़ांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल केला आहे. ग्राहकाला पत्ता नसतानाच खात्यातील रक्कम गायब केली जात आहे.
रेल्वे ओव्हरब्रिजजवळील गोकुळनगर येथे राहणाऱया रावसाहेब पुंडलिक मोहिते यांच्या मोबाईलवर रविवारी दोन मेसेज आले. दोन वेळा त्यांच्या बँक खात्यातून दहा-दहा हजार रुपये काढल्याचा उल्लेख त्या मेसेजमध्ये होता. आपण तर पैसे काढले नाहीत. असे असताना बँकेकडून असा मेसेज का आला? असा प्रश्न त्यांना पडला.
सोमवारी त्यांनी टिळकवाडी येथील महाराष्ट्र बँकेत जाऊन चौकशी केली. आपण कोणाला पासवर्ड दिला नाही तरीही आपल्या खात्यातील 20 हजार रुपये कसे गायब झाले? अशी विचारणा केली. ‘तुम्ही कोणाला तरी पासवर्ड किंवा ओटीपी दिला असणार. त्यामुळेच तुमच्या बँक खात्यातील रक्कम गायब झाली असणार’, असे कर्मचाऱयांनी सांगितले.